काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सनसनाटी विजय मिळवला होता. तर राज्यात सत्ता येणार म्हणून निश्चिंत झालेल्या काँग्रेसचा अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता हरियाणात झालेल्या पालिका निवडणुकीमध्येही भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्यातील १० पैकी ९ महानगरपालिकांमध्ये भाजपाचे महापौर विजयी झाले आहेत. तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली आहे. मात्र काँग्रेसला एकाही ठिकाणी विजय मिळवला आलेला नाही. याशिवाय ३८ नगरपालिकांपैकी बहुतांश नगरपालिकांमध्येही भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
हरियाणामधील १० महानगरपालिका आणि ३८ महानगरपालिकांसाठी २ आणि ३ मार्च रोजी मतदान झालं होतं. तर आज मतमोजणी झाली. यामध्ये हिसार, करनाल, गुरुग्राम, रोहतक, फरिदाबाद, यमुनानगर, पानीपत, अंबाला आणि सोनीपत या महानगरपालिकांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. तर मानेसर महानगरपालिकेमध्ये अपक्ष इंद्रजित यादव हे विजयी झाले आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या कार्यकाळाचं एक वर्ष पूर्ण आजच पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीतील विजयानंतर राज्यात ट्रिपल इंजिनचं सरकार आल्याची भावना भाजपाचे कार्यकर्ते व्यक्त करत असून, या निकालांनंतर त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
दुसरीकडे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदर सिंह हुड्डा यांनी मात्र या पराभवामुळे आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जिथे या निवडणुका झाल्या, तिथे काँग्रेस पक्ष आधीही नव्हता. त्यामुळे या पराभवामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे हुड्डा यांनी सांगितले.