लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपाची ‘एच फाइल’ बाहेर काढली. गेल्या वर्षी झालेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकांची चोरी करण्यात आली. निवडणूक आयोगाने भाजपशी हातमिळवणी करून त्या पक्षाला विजय मिळवून दिला, असा आरोप करत त्यांनी आणखी एक बॉम्ब फोडला. भाजपने आणि निवडणूक आयोगाने या आरोपाचे खंडन केले. काँग्रेसने हरयाणा निवडणुकीआधी हे का सांगितले नाही, असा सवाल केंद्रीय निवडणूक आयोगाने केला.
राहुल गांधी म्हणाले, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व इतर दोन निवडणूक आयुक्तांनी भाजपसोबत संगनमत केले आहे. निवडणूक आयोगाने ‘ऑपरेशन सरकार चोरी’ सुरू करून काँग्रेसचा प्रचंड विजय पराभवात बदलला. मी करत असलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ माझ्याकडे १०० टक्के सच्चे पुरावे आहेत. या सगळ्या प्रकारामुळे मी हादरून गेलो. माझ्या टीमला अनेकदा डेटा तपासायला सांगितलं. मला युवक आणि जनरेशन झीला सांगायचे आहे की, तुमचे भविष्य चोरले जात आहे, असेही राहुल म्हणाले. २०२४ च्या हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या होत्या.
ब्राझीलच्या मॉडेलचा हरयाणा मतदारयादीत २२ वेळा फोटो
राहुल गांधी यांनी सांगितले की, हरयाणात एका महिलेचे फोटो मतदारयादीत वेगवेगळ्या नावांनी व तपशिलांसह अनेकवेळा वापरण्यात आले. ब्राझीलमधील महिला मॉडेल असलेल्या मॅथ्यूस फेरेरो यांचा हा फोटो असून, त्यांना स्वीटी, सीमा, सरस्वती अशी नावे मतदारयाद्यांत देण्यात आली आहेत. त्यांना दिलेली २२ वेगवेगळी नावे व त्याबरोबर या मॉडेलचा फोटो अशा नोंदी मतदारयाद्यांत आढळल्या आहेत.
आयोगाचा सवाल, मग सुधारणेला विरोध का?
राहुल गांधी यांनी मागील निवडणुकांमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले, तरी मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी सुरू केलेल्या एसआयआर प्रक्रियेला त्यांनी विरोध केला आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनीबुधवारी सांगितले.
२५,४१,१४४ बनावट मतदार सापडल्याचा दावा
- राहुल गांधींनी हरयाणाच्या मतदार यादीत २५,४१,१४४ बनावट मतदार सापडले असल्याचा दावा केला.
- ते म्हणाले, अनेकांच्या नावांची पुनरावृत्ती झाली असून, अवैध पत्ते आणि एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे असे गैरप्रकार झाले आहेत. हरयाणामध्ये प्रत्येक ८ पैकी १ मतदार बनावट आहे.
- काँग्रेस २२,७७९ मतांनी हरली. हे फक्त ८ जागांवरील मार्जिन इतके आहे.
Web Summary : Rahul Gandhi accused the BJP and Election Commission of rigging Haryana elections, revealing an 'H file' alleging 2.5 million fake voters. He claimed voter lists contained repeated names and fraudulent addresses, questioning the integrity of the electoral process. The Election Commission refuted the allegations.
Web Summary : राहुल गांधी ने भाजपा और चुनाव आयोग पर हरियाणा चुनाव में धांधली का आरोप लगाया, जिसमें 25 लाख फर्जी मतदाताओं का आरोप लगाते हुए एक 'एच फाइल' का खुलासा किया। उन्होंने मतदाता सूची में नामों की पुनरावृत्ति और धोखाधड़ी वाले पते होने का दावा किया, जिससे चुनावी प्रक्रिया की निष्ठा पर सवाल उठे। चुनाव आयोग ने आरोपों का खंडन किया।