हार्वर्डवाल्यांना हार्डवर्कचा अर्थ समजला - पंतप्रधान मोदी
By Admin | Updated: March 1, 2017 15:55 IST2017-03-01T15:55:06+5:302017-03-01T15:55:06+5:30
. एका बाजूला ते आहेत जे हार्वर्ड विद्यापीठाबद्दल बोलतात आणि एका बाजूला गरीबाचा मुलगा आपल्या मेहनतीने देशाची अर्थव्यवस्था बदलत आहे.

हार्वर्डवाल्यांना हार्डवर्कचा अर्थ समजला - पंतप्रधान मोदी
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 1 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तरप्रदेशातील जाहीर सभेला संबोधित करताना नोबेल पारितोषिक विजेते हार्वर्डमधील अर्थतज्ञ अर्मत्य सेन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. हार्वर्डपेक्षा हार्डवर्क जास्त महत्वाचे आहे. एका बाजूला ते आहेत जे हार्वर्ड विद्यापीठाबद्दल बोलतात आणि एका बाजूला गरीबाचा मुलगा आपल्या मेहनतीने देशाची अर्थव्यवस्था बदलत आहे. उत्तरप्रदेशातील महाराजगंज येथील सभेत मोदींनी हे विधान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर अर्मत्य सेन यांनी जोरदार टीका केली होती. नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावलेली नाही. नोटाबंदीचा जीडीपीवर परिणाम झालेला नाही त्याचा संदर्भ घेऊन मोदींनी अर्मत्य सेन यांच्यावर निशाणा साधला. हार्वर्डचे लोक काय विचार करत होते आणि हार्डवर्कने काय घडवले ते हार्वर्डवाल्यांना समजेल असे मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या विकासाच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. उत्तरप्रदेशमध्ये विकास दिसतोय असे अखिलेश म्हणतात. पण उत्तरप्रदेशची स्थिती आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटासारखी झाल्याचे राज्य सरकारची वेबसाईट सांगते याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांपैकी पहिल्या पाच टप्प्यातच भाजपाचा विजय झालाय. उरलेल्या दोन टप्प्यात मिळणा-या जागा बोनस आहेत असा विजयाचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.