नवी दिल्ली - १३ वर्ष अंथरूणाला खिळलेल्या हरीश राणाच्या इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्यानंतर आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. एम्समध्ये भरती असलेल्या हरीश राणाबाबत हॉस्पिटलने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर आता त्याच्या मेडिकल बोर्डाचा विस्तार करून सदस्य संख्या ५ वरून १० पर्यंत वाढवण्यात आली आहे. हरीश राणा याला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठीच नव्हे तर त्याच्या कुटुंबीयांना समुपदेशन करण्यासाठीही हे महत्त्वाचे मानले जात आहे.
एम्सच्या नवीन मेडिकल बोर्डात विविध तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्यात मानसोपचारतज्ज्ञांची संख्याही वाढली आहे. याचा उद्देश केवळ हरीशच्या स्थितीचे मूल्यांकन करणे हाच नाही, तर या कठीण काळात कुटुंबाला मानसिक आधार देणे हा देखील आहे. हरीश राणा सध्या एम्समधील पॅलिएटिव्ह केअर युनिटमध्ये दाखल आहे, जिथे गंभीर रुग्णांना विश्रांती आणि आधारभूत उपचार दिले जातात. डॉक्टरांच्या मते हरीशची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु अनेक अवयव पूर्णपणे बरे झालेले नाहीत. उपचारावेळी डॉक्टरांनी हरीशला देण्यात येणारे काही मेडिकल सपोर्ट हटवणे सुरू केले आहे. त्याचा पोषण आधारही काढून घेण्यात आला आहे.
तसेच सध्या हरीशला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं नाही. परंतु आवश्यक औषधे अजूनही दिली जात आहेत. ही प्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार पार पाडली जात आहे आणि प्रत्येक निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतला जात आहे असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. हरीश राणाच्या अवयवांच्या स्थितीबाबतही तपास सुरू आहे. त्याच्या शरीराचे अनेक अवयव पूर्णपणे निरोगी नसल्यामुळे अवयवदान शक्य होईल की नाही याचा अंतिम निर्णय वैद्यकीय तपासणीनंतरच घेतला जाईल.
कुटुंबाला मानसिक आधार देण्यावर भर
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात कौटुंबिक समुपदेशन हा देखील एक महत्त्वाचा पैलू आहे. मानसोपचार तज्ज्ञांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम दररोज आई-वडील आणि भावाशी संवाद साधत आहे. या कठीण परिस्थितीसाठी कुटुंबाला मानसिकदृष्ट्या तयार केले जात आहे. मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारून रुग्णालय प्रशासनाने कुटुंबातील एका सदस्याला हरीशसोबत राहण्याची परवानगी दिली आहे. हरीशची आई बहुतेक वेळा त्याच्यासोबत असते. त्याचे वडील, भाऊ आणि बहीण देखील वेळोवेळी भेटायला येतात असं एम्स प्रशासनाने सांगितले आहे.
Web Summary : AIIMS expands Harish Rana's medical board after Supreme Court's decision on his plea. The focus is on providing supportive care and counseling to the family during this difficult time. His condition is stable but critical.
Web Summary : सुप्रीम कोर्ट के फैसले के बाद एम्स ने हरीश राणा के मेडिकल बोर्ड का विस्तार किया। इस मुश्किल समय में सहायक देखभाल और परिवार को परामर्श प्रदान करने पर ध्यान केंद्रित किया जा रहा है। उनकी हालत स्थिर है लेकिन गंभीर है।