उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हरदोईच्या माधौगंज परिसरातील बांगरमऊ येथे लग्नमंडपात नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिल्याने एकच गोंधळ उडाला. सप्तपदीआधी त्याला गर्लफ्रेंडची आठवण आल्यावर त्याने लग्नाला नकार दिला आणि लग्नासाठी खर्च केलेले नऊ लाख रुपयेही वधूकडच्या मंडळींना परत केले. अचानक लग्नमंडपात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पाहुणेमंडळी देखील आली होती. तितक्यात नवरदेवाला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण आली. गर्लफ्रेंडने त्याला सांगितलं होतं की, जर त्याने लग्न केलं तर ती आत्महत्या करेल. यामुळेच नवरदेवाने ऐन लग्नमंडपात लग्न करण्यास नकार दिला. यानंतर एकच गोंधळ उडाला. लग्नाचा खर्च आणि भेटवस्तू परत करणार असं सांगितल्यावर दोन्ही बाजुच्या लोकांनी यावर चर्चा केली. त्यामुळेच नवरीशिवायच मंडळी परत आपल्या घरी गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगरमऊ कोतवाली भागातील दुल्लापूर बायपास पॉवर हाऊसजवळ गुरुवारी मोठ्या आनंदा नवरदेव आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. वधू-वरांच्या बाजूने काही विधी पार पडले. लग्नाआधी नवरीकडच्या लोकांनी हुंडा देखील दिल्याचं म्हटलं जात आहे. सप्तपदी होणार तेवढ्यात नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला.
नवरीकडच्या लोकांनी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना लग्न मंडपातून बाहेर न जाण्यास सांगितलं. त्यानंतर पोलिसांना ११२ डायल करून या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनीही नवरदेवाला समजावून सांगितलं मात्र काहीही परिणाम झाला नाही. नवरदेव दीपेंद्र सिंह याने सांगितलं की, गर्लफ्रेंडमुळे हा निर्णय घेतलेला आहे. जर मी लग्न केलं तर ती आत्महत्या करेल असं तिने सांगितल्याचं म्हटलं आहे.