Hardik Patel: मोदी-शाहांविरोधात केली राजकारणाला सुरुवात; त्याच भाजपचे हार्दिक पटेल घेणार सदस्यत्व 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 09:01 AM2022-06-02T09:01:01+5:302022-06-02T09:03:23+5:30

गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनाचे सूत्रधार असलेल्या हार्दिक पटेल यांनी तत्कालीन भाजप सरकारसमोर आव्हान निर्माण केले होते. आता त्याच भाजपमध्ये ते प्रवेश करत आहेत.

hardik patel political career started against bjp and patidar reservation agitation now left congress and join bjp | Hardik Patel: मोदी-शाहांविरोधात केली राजकारणाला सुरुवात; त्याच भाजपचे हार्दिक पटेल घेणार सदस्यत्व 

Hardik Patel: मोदी-शाहांविरोधात केली राजकारणाला सुरुवात; त्याच भाजपचे हार्दिक पटेल घेणार सदस्यत्व 

Next

अहमदाबाद: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणाला वेग यायला हळूहळू सुरुवात होत असल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसणे सुरूच आहे. काँग्रेस नेते यांनी पक्ष आणि नेतृत्वावर सडकून टीका करत, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक पाहता हार्दिक पटेल (Hardik Patel) यांच्या राजकारणाची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या विरोधानेच झाली. त्याच भाजपमध्ये आता हार्दिक पटेल प्रवेश करणार आहेत.

सन २०१४ मध्ये पाटीदार आंदोलनाच्या निमित्ताने प्रथम हार्दिक पटेल यांची चर्चा देशभर झाली होती. पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या सरकारविरोधात रान उठवण्यात आले होते. शेवटी भाजपने आनंदीबेन पटेल यांना पदावरून दूर करत विजय रुपाणी यांना नवे मुख्यमंत्री केले. 

२०१५ मध्ये पहिली मोठी रॅली

सरदार पटेल ग्रुपमध्ये सक्रीय सहभागी झाल्यानंतर पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सन २०१५ विसनगर येथे पहिली मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये हार्दिक पटेल यांचा सक्रीय सहभाग होता. एका भाजप खासदाराच्या पक्ष कार्यालायाची तोडफोड केल्याचा आरोप तेव्हा हार्दिक पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. स्थानिक न्यायालयाने याप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने हार्दिक पटेल यांना मोठा दिलासा दिला होता. 

सूरतमधील रॅलीत ३ लाख जणांचा सहभाग

पाटीदार समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गुजरात राज्यात बहुतांश ठिकाणी मोठे आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये सूरतमध्ये झालेल्या एका रॅलीत तब्बल तीन लाख जणांनी आपला सहभाग नोंदवला. तेव्हापासून हार्दिक पटेल यांचे नाव देशाच्या राजकारणात गाजायला सुरुवात झाली. तसेच अहमदाबाद येथील जीएमडीसी मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यानंतर पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा वणवा राज्यभरात मोठ्या प्रमाणात पसरला. संपूर्ण राज्यात ५०० हून अधिक हिंसक घटना घडल्या होत्या. यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. हार्दिक पटेलसह अन्य आंदोलकांवर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. 

अमित शाहांचा जनरल डायर असा उल्लेख

हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर टीका करताना अमित शाह यांचा जनरल डायर असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला होता. यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आरक्षण आयोग स्थापन करत पाटीदार आंदोलनातील सहभागी झालेल्यांवरील केसेस मागे घेण्याची घोषणा केली होती. मात्र, २०१७ मध्ये पाटीदार समाजाच्या मतांचे विभाजन झाले. गुजरातमध्ये मजबूत पकड असलेली भाजप १०० चा आकडाही पार करू शकली नव्हती.

२०१९ ला काँग्रेस प्रवेश, २०२२ मध्ये सोडचिठ्ठी

सन २०१७ मध्ये झालेल्या गुजरात निवडणुकीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांची प्रथम भेट झाली होती. यानंतर हार्दिक पटेल यांनी सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सन २०२० मध्ये काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्या खांद्यावर गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली होती. काँग्रेसमध्ये या पदावर नियुक्ती झालेले हार्दिक पटेल सर्वांत कमी वयाचे नेते आहेत. मात्र, अवघ्या तीन वर्षांत काँग्रेसवर आणि पक्ष नेतृत्वावर हल्लाबोल करत हार्दिक पटेलने सोडचिठ्ठी दिली आणि आता ते भाजपवासी होत आहेत. 
 

Web Title: hardik patel political career started against bjp and patidar reservation agitation now left congress and join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.