माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अंत्यसंस्कार यावरून अजूनही राजकारण सुरू आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी जमीन का दिली जात नाही आणि त्यासाठी दिरंगाई का केली जात आहे, असा सवाल काँग्रेस सातत्याने उपस्थित करत आहे. तसेच निगम बोध घाटावर झालेल्या अंत्यसंस्कारावरही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काँग्रेसचे लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात, मात्र डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थी विसर्जनाला कोणीही आलं नव्हतं असं म्हटलं आहे.
काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. या मुद्द्यावर काँग्रेस फक्त राजकारण करत आहे, असं भाजपच्या बाजूने सांगण्यात आलं आहे. तसेच भाजपाने यापूर्वीच डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगितलं आहे. निगम बोध घाटात मात्र अंत्यसंस्कारावर प्रश्न उपस्थित करून काँग्रेस फक्त राजकारण करत आहे असं म्हटलं.
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी काँग्रेसच्या आरोपांवर हल्लाबोल करत काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत असल्याचं म्हटलं. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या स्मारकाबाबत बोललं जात होतं ते स्मारकासाठी सरकार तयार आहे, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की, त्यात काही अडचणी आहेत. गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करता येत नव्हते.
हरदीप पुरी म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळातही देशाच्या अनेक माजी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे अंत्यसंस्कार एकता स्थळावर झाले आहेत, जिथे त्यांचे स्मारकही बांधले गेले आहे. काँग्रेसची इच्छा असती तर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करता आले असते कारण ती जागा आधीच चिन्हांकित आहे आणि त्या ठिकाणी दोन स्मारक बांधण्यासाठी जागा शिल्लक आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे वाहन कोणत्याही ताफ्यामुळे थांबलेलं नाही आणि निगम बोध घाटावरही त्यांच्यासाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली. काँग्रेस फक्त राजकारण करत आहे. काँग्रेस नेते फक्त फोटो काढण्यासाठी तिथे पोहोचतात, पण आज जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांच्या अस्थींचं विसर्जन झालं, तेव्हा काँग्रेसचा एकही नेता तिथे पोहोचला नाही.