आधी हात पकडलास, आता मुलीच्या पाया पड - सुप्रीम कोर्ट
By Admin | Updated: September 9, 2015 08:19 IST2015-09-08T11:50:40+5:302015-09-09T08:19:53+5:30
एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बेडरुममध्ये शिरुन तिचा हात धरणा-या तरुणाला कमी शिक्षा हवी असेल तर त्याने संबंधीत मुलीच्या पाया पाडून तिची माफी मागावी असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

आधी हात पकडलास, आता मुलीच्या पाया पड - सुप्रीम कोर्ट
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - एकतर्फी प्रेमातून मुलीच्या बेडरुममध्ये शिरुन तिचा हात धरणा-या तरुणाला कमी शिक्षा हवी असेल तर त्याने संबंधीत मुलीच्या पाया पाडून तिची माफी मागावी असा सल्ला सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
सिकंदराबादमधील भाग्यलक्ष्मीनगरमध्ये राहणा-या एका तरुणाचे त्याच्या शेजारी राहणा-या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. संबंधीत तरुण हा दररोज त्या मुलीचा पाठलाग करायचा. या प्रकाराची मुलीने आईवडिलांकडे तक्रार केली होती. मुलीच्या पालकांनी त्या तरुणाला दमबाजीही केली होती. मात्र तरीदेखील त्या तरुणाने मुलीचा पिछा सोडला नाही. जानेवारी २००५ मध्ये सकाळी त्या तरुणाने मुलीच्या बेडरुममध्ये प्रवेश केला व तिचा हात धरुन लग्नाची मागणी घेतली. यासंदर्भात पिडीत मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. जबरदस्तीने घरात प्रवेश करुन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्या तरुणाला कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षाचा तुरुंगवास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. हायकोर्टानेही याप्रकरणात शिक्षा कायम ठेवली मात्र शिक्षेचा कालावधी पाच वरुन दोन वर्ष एवढा करण्यात आला होता.
हायकोर्टाच्या निकालानंतर संबंधीत तरुणाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. नुकतीच सुप्रीम कोर्टाच्या टी एस ठाकूर आणि वी गोपाल गौडा यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. तरुणाला शिक्षा भोगावीच लागेल कारण त्याच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. पण त्याची शिक्षा एक वर्षांवर आणली जाऊ शकते. आधी हात धरलास आता संबंधीत मुलीचे पाय धरुन माफी मागावी लागेल व तिने माफी देण्यास तयारी दर्शवली तर तुम्ही तडजोड करुन शिक्षा कमी होण्यासाठी प्रयत्न करु शकता' असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.