अर्धा डझन केंद्रीय मंत्री आतून नाखूश
By Admin | Updated: November 12, 2014 01:49 IST2014-11-12T01:49:42+5:302014-11-12T01:49:42+5:30
मोदींच्या मंत्रिमंडळातील किमान अर्धा डझन मंत्री मिळालेले मंत्रलय आणि देण्यात आलेल्या जबाबदारीबाबत समाधानी नाहीत, मात्र त्यांच्याकडे त्यावर संतुष्ट होण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.

अर्धा डझन केंद्रीय मंत्री आतून नाखूश
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
मोदींच्या मंत्रिमंडळातील किमान अर्धा डझन मंत्री मिळालेले मंत्रलय आणि देण्यात आलेल्या जबाबदारीबाबत समाधानी नाहीत, मात्र त्यांच्याकडे त्यावर संतुष्ट होण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. ते किमान मंत्रिमंडळात जागा तर मिळाली, यातच आनंद मानत आहेत.
नाखूश असूनही तोंड उघडू शकत नाही, अशी ज्यांची अवस्था झाली आहे त्यात मुख्तार अब्बास नकवी, राजीवप्रताप रुडी, हरीभाई चौधरी, रामकृपाल यादव आणि हंसराज अहीर यांच्यासारख्या मंत्र्यांचा समावेश आहे. काही जण मनासारखे मंत्रलय न मिळाल्याने तर काही चार ते पाच वेळा खासदार राहूनही राज्यमंत्री बनविण्यात आल्याने नाराज आहेत. चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी खत आणि रसायन राज्यमंत्री असूनही कामकाजात मोठे बदल करण्याची तयारी चालविली आहे. मंगळवारी पदभार स्वीकारताच त्यांनी सरकारच्या कसोटीवर न उतरलेल्या विभागांना लक्ष्य बनविणार असल्याचे संकेत दिले. ज्या मंत्रलयात चांगले काम करण्याची क्षमता होती ते न मिळाल्याचे दु:ख अहीर यांनाही लपवता आले नाही. मिळालेल्या खात्यावर आपण खूश असल्याचे सांगत त्यांनी नाराज असल्याचा इन्कार केला. रसायन आणि खत मंत्रलय महत्त्वपूर्ण असून खासदार असतानाही मी या मंत्रलयाशी निगडित अनेक मुद्दय़ांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यामुळे येथे चांगले काम करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाराजी बोलून कशी दाखवणार? अहीर कोणताही दाखला देत असोत, मोदींच्या नव्या टीममधील अनेक मंत्री खूश नाहीत. मोदींच्या दबदब्यामुळे ते बोलायला तयार नाहीत. अनेकांना मंत्रिपदाची संधी मिळाली नाही आपल्याला ती मिळाली, यातच त्यांनी आनंद मानला आहे. अनुराग ठाकूर, रमेश वैश्य आणि अधिकांश राज्यमंत्र्यांना चार-पाच वेळा खासदार राहूनही राज्यमंत्रिपद पदरी पडल्याचे दु:ख आहे. महेश शर्मा हे नोएडातून प्रथमच खासदार बनले, मात्र त्यांना थेट स्वतंत्र प्रभार मिळाला. एवढेच नव्हे तर तीन महत्त्वपूर्ण विभागांची जबाबदारीही देण्यात आली. रुडी, हर्षवर्धन, मुख्तार अब्बास नकवी हेही नाखूश आहेत़ मात्र अनुराग ठाकूर, वैश्य या राज्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या यादीचा भाग न बनल्याचे त्यांना समाधानही आहे.