दीड तोळे सोन्याची पोत केली परत़़़
By Admin | Updated: March 24, 2015 23:38 IST2015-03-24T23:07:09+5:302015-03-24T23:38:10+5:30
सटाणा तालुक्यातील देवळाणे येथील अमोल हिरे याचा प्रामाणिकपणा

दीड तोळे सोन्याची पोत केली परत़़़
सटाणा तालुक्यातील देवळाणे येथील अमोल हिरे याचा प्रामाणिकपणा
नाशिक : तोतया पोलिसांकडून वृद्ध दाम्पत्याची केली जाणारी लूट, दुचाकीस्वारांकडून ओरबाडले जाणारे महिलांचे मंगळसूत्र, वाहनांच्या डिक्कीतून चोरून नेली जाणारी रोकड या घटनांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यात सापडलेली दीड तोळ्याची सोन्याची पोत मालकाचा शोध घेऊन परत केल्याचे उदाहरण शहरात नाही, तर ग्रामीण भागात घडले आहे़ या प्रकारची प्रामाणिकतेची उदाहरणे समोर आल्यानंतर अजूनही चांगुलपणा शिल्लक असल्याचे समाधान मिळाल्याशिवाय राहात नाही़
खुटवडनगर येथील प्रतिभा काशीनाथ पगार या १२ मार्चला सटाणा तालुक्यातील देवळाणे येथे आपल्या माहेरी गेल्या होत्या़ बसस्टॅण्डवर उतरल्यानंतर प्रवासी रिक्षाने त्या घरी गेल्या़ या प्रवासादरम्यान त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत कोठेतरी तुटून पडली़ ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पगार यांच्या माहेरच्यांनी बसस्टॅण्ड ते घराजवळील रिक्षास्टॅण्डचा परिसर पिंजून काढला. मात्र, पोत काही मिळाली नाही़ या घटनेनंतर सुमारे सात दिवसांनी म्हणजे रिक्षास्टॅण्डशेजारीच असलेल्या एका हिरे बार्बर शॉपमधील अमोल तानाजी हिरे यांना ही पोत सापडली़
केशकर्तनालयाचा व्यवसाय असलेल्या हिरे यांना अहिरे यांच्या मुलीची सोन्याची पोत हरविल्याचे कळाले़ त्यांनी तत्काळ यादवराव अहिरे यांचे घर गाठले व विचारणा करून सदर पोत परत केली़ अमोल हिरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अहिरे यांनी एक हजाराचे बक्षीस देऊ केले; मात्र त्यांनी ते नाकारले़ यामुळे अमोल हिरे हे देवळाणे गावात चर्चेचा विषय ठरले आहेत़(प्रतिनिधी)
फोटो :- २४ पीएचएमआर १३०
दीड तोळे सोन्याची पोत परत करणारे अमोल हिरे.