जेएनयूमधील कार्यक्रमाला हाफिझ सईदचा पाठिंबा - राजनाथ सिंह
By Admin | Updated: February 14, 2016 16:44 IST2016-02-14T16:44:55+5:302016-02-14T16:44:55+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाल पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आणि त्या संघटनेचा प्रमुख हाफिझ सईदचा पाठिंबा होता. देशाने हे सत्य स्वीकारले पाहिजे.

जेएनयूमधील कार्यक्रमाला हाफिझ सईदचा पाठिंबा - राजनाथ सिंह
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - संसद हल्ला प्रकरणात दोषी ठरल्यानंतर फासावर लटकवण्यात आलेल्या अफजल गुरुच्या स्मरणार्थ जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाल पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना आणि त्या संघटनेचा प्रमुख हाफिझ सईदचा पाठिंबा होता. देशाने हे सत्य स्वीकारले पाहिजे. हे दुर्देव आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
सरकार कुठल्याही परिस्थितीत अशी देश विरोधी कृत्य सहन करणार नाही असे त्यांनी सांगितले. या विषयाचे राजकारण करु नका असे राजनाथ सिंह यांनी आवाहन केले. जेव्हा देश विरोधी घोषणा दिल्या जातात तेव्हा सर्वांनी एकासूरात बोलले पाहिजे असे राजनाथ म्हणाले.
दिल्ली पोलिसांनी हाफीझ सईदच्या टि्वटसचे स्र्किन शॉटस पोस्ट केल्यानंतर दोन दिवसांनी राजनाथ सिंह यांनी हे विधान केले. जेएनयूतील वादाला लष्कर-ए-तोएबाशी जोडण्याची भाजपची ही पहिली वेळ नाही.
याआधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते जेएनयूमध्ये आले त्यावेळी हे नेते दहशतवादी संघटनांच्या सूरांमध्ये सूर मिसळून बोलत आहेत. हा शहीदांचा अपमान आहे. यामुळे देशविरोधी ताकतींना बळ मिळेल असे भाजपने म्हटले होते.