हाफीज सईदने दिला होता हिंदूंना मारण्याचा आदेश

By Admin | Updated: August 21, 2015 22:36 IST2015-08-21T22:36:58+5:302015-08-21T22:36:58+5:30

जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यानेच आपल्याला जिहाद पुकारून हिंदूंना ठार मारण्याचा

Hafiz Saeed had ordered to kill Hindus | हाफीज सईदने दिला होता हिंदूंना मारण्याचा आदेश

हाफीज सईदने दिला होता हिंदूंना मारण्याचा आदेश

नवी दिल्ली : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यानेच आपल्याला जिहाद पुकारून हिंदूंना ठार मारण्याचा आदेश दिला होता असा दावा काश्मिरातील उधमपूर हल्ल्यात पकडण्यात आलेला पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद नावेद याने केला आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथक सध्या नावेदची कसून चौकशी करीत आहे. या चौकशीदरम्यान नावेदने दिलेल्या माहितीनुसार हाफीज सईदने लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवादी प्रशिक्षण केंद्राचा दोनदा दौरा केला होता. त्यावेळी नावेदही तेथे प्रशिक्षण घेत होता. भारतातील हिंदूंना ठार मारणे आणि जिहाद पुकारण्याचे धडे हाफीजनेच त्याला दिले होते. यासाठी काही व्हिडिओही दाखविण्यात आले. नावेदसोबत २५ जण या प्रशिक्षणात सामील होते. त्यात अफगाणिस्तान आणि पश्तूनमधील युवकांचा समावेश होता. या युवकांच्या मनात भारताबद्दल जास्तीत जास्त तिरस्काराची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने सईदने अत्यंत कडवे भाषण दिले होते.
नावेद पाकमधील गुलाम
मुस्तफाबादचा रहिवासी
दुसरीकडे लाय डिटेक्टर चाचणीतही नावेदने तो पाकिस्तानी नागरिक असून लष्कर-ए-तोयबाच्या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतल्याचे कबूल केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अबू कासिम हा त्याचा मार्गदर्शक होता. २० वर्षीय नावेद हा पाकिस्तानच्या फैसलाबादजवळील गुलाम मुस्तफाबादचा रहिवासी आहे. त्याला एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. एक भाऊ कपड्याचा व्यवसाय करतो, तर दुसरा व्याख्याता आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Hafiz Saeed had ordered to kill Hindus