Gurmeet Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आला आहे. यावेळी राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल मिळालाय. पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पहाटेच पोलिस संरक्षणात सिरसा डेरा येथील आपल्या आश्रमात रवाना झाला. विशेष म्हणजे, शिक्षा झाल्यापासून राम रहीम १४ व्यांदा तुरुंगातून बाहेर आला आहे. यापूर्वी ९ एप्रिल रोजी तो २१ दिवसांच्या फर्लोवर बाहेर आला होता.
गुरमीत राम रहीम महिला साधूंचे लैंगिक शोषण आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याकांड प्रकरणात रोहतकच्या सुनारिया तुरुंगात 2017 पासून शिक्षा भोगत आहे. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत राम रहीमला १४ वेळा पॅरोल आणि फरोल मिळाला आहे. आता तो ५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पॅरोलवर बाहेर असेल. पॅरोलच्या अटींनुसार त्याला सिरसा आश्रमातच राहावे लागेल. यापूर्वी एप्रिलमध्ये राज्य सरकारने राम रहीमला २१ दिवसांच्या फर्लोवर सोडले होते.
दरम्यान, पॅरोलवर बाहेर येणे ही राम रहीमसाठी नवीन गोष्ट नाही. याआधीही तो पॅरोलवर तुरुंगातून बाहेर येत आलाय. आता पॅरोलवर बाहेर आलेला राम रहीम येत्या १५ ऑगस्ट रोजी त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करणार आहे. या दरम्यान संपूर्ण महिनाभर आश्रमात विविध कार्यक्रम होणार आहेत. यापूर्वी राम रहीम २१ दिवसांच्या फर्लोवर बाहेर आला होता, तेव्हा २९ एप्रिल रोजी डेरा सच्चा सौदाचा स्थापना दिन होता. तसेच, फेब्रुवारी महिन्यातही दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान राम रहीम ३० दिवसांसाठी पॅरोलवर बाहेर आला होता.
कोणत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे?डेरा प्रमुख ऑगस्ट २०१७ पासून रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २५ ऑगस्ट २०१७ रोजी पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने राम रहीमला साध्वी (महिला शिष्य) बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्याला प्रत्येकी २० वर्षांच्या तुरुंगवासाच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या. तो एका पत्रकाराच्या हत्येप्रकरणीदेखील शिक्षा भोगत आहे.