गुरगावात ईशान्येकडील दोघांवर हल्ला
By Admin | Updated: October 22, 2014 05:17 IST2014-10-22T05:17:25+5:302014-10-22T05:17:25+5:30
आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली.

गुरगावात ईशान्येकडील दोघांवर हल्ला
गुरगाव : आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली.
या तीनपैकी दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी जेम्स नावाच्या एका युवकाच्या डोक्यावरचे केसही कापल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉल सेंटरमध्ये काम करणारा जेम्स आणि त्याचे दोन मित्र सिकंदरपूर येथे भाड्याने राहतात. बुधवारी रात्री आठ तरुण त्यांच्याकडे आले आणि सोबत दारू पिण्यास सांगितले. या तिघांनी त्यांना नकार दिल्यामुळे ते चिडले आणि त्यांच्यात जोरदार भांडण झाले. यावेळी आठही जणांनी या तीन नागा युवकांना बेदम मारहाण केली आणि जेम्सचे केस कापले. जखमी नागा युवकांना गुरगावच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान ईशान्य भारतीयांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांबाबत गृहमंत्री राजनाथसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. याआधीही कर्नाटकात कानडी भाषेत न बोलल्यावरून ईशान्य भारतातील तीन युवकांना मारहाण करण्यात आली होती.
केंद्राने मागवला अहवाल
ईशान्येकडील तीन युवकांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तसेच हल्लेखोरांना पकडण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांच्या अहवालाची मागणी गृहमंत्रालयाने दोषी व्यक्तींविरुद्ध तात्काळ कारवाई केली जावी व या घटनेचा सविस्तर अहवाल पाठवावा, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)