गुजरातमधील मांडवीत मुस्लीमांना गरब्यामध्ये प्रवेशबंदी
By Admin | Updated: October 3, 2015 08:52 IST2015-10-03T08:52:03+5:302015-10-03T08:52:03+5:30
कच्छमधल्या मांडवी तालुक्यातल्या मुस्लीमांना नवरात्रीमध्ये गरब्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गुजरातमधील मांडवीत मुस्लीमांना गरब्यामध्ये प्रवेशबंदी
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. ३ - कच्छमधल्या मांडवी तालुक्यातल्या मुस्लीमांना नवरात्रीमध्ये गरब्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या विषयावरून दरवर्षी वाद विवाद होत असतात, यंदाचे वर्षही त्याला अपवाद ठरणार नाही असे दिसत आहे. स्थानिक गरबा आयोजक आणि हिंदू संघटन युवा मोर्चा या संघटनांनी हिंदूंनीदेखील गोमूत्र शिंपडून घेणे आणि कपाळाला टिळा लावून घेणे या दोन अटी मान्य असतिल तरच गरब्याला यावे अशी अट घातली आहे.
आम्ही गेल्यावर्षीच अन्य धर्मीयांना गरब्यामध्ये प्रवेश देणे बंद केले होते आणि यंदाही कडक नियम राहतिल असे रघुवीरसिंह जाडेजा यांनी सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांमुळे आम्ही अशी पावले उचलत असल्याचे जाडेजा यांनी म्हटले आहे.
बोटी बांधण्याच्या क्षेत्रामध्ये शेकडो वर्षांची ख्याती असलेल्या मांडवीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम लोकसंख्या आहे. हिंदू - मुस्लीम संघर्षाचा या भागात इतिहास नसतानाही गरबा आयोजक ही बंदी घालत आहेत. जाडेजा यांच्या संस्थेची माणसं मांडवीमधल्या सगळ्या गरबा ठिकाणांना भेटी देणार असून कुणी मुस्लीम नाहीत ना याची खात्री करणार आहेत. त्यांची संघटना विश्व हिंदू परीषदेशी निगडीत आहे.
अशा प्रकारच्या बंदीबाबत आमची काय भूमिका आहे या संदर्भात मुस्लीम समाजातील नेत्यांची बैठक बोलावल्याचे स्थानिक नेते आझम अंगडिया यांनी सांगितले. वातावरण दुषित करण्यासाठी काहीजण जाणुनबुजून प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
अनेक हिंदू रोजा पाळतात तर अनेक मुस्लीम गणेश चतुर्थीमध्ये उत्सव साजरा करतात असे असताना अशी बंदी घालणं योग्य नसल्याचं मत भाजपाच्या एका स्थानिक नेत्याने व्यक्त केले आहे. ज्यावेळी कुठलाही धार्मिक तणाव नाही अशावेळी अशा बंदी घालणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.