"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 01:47 PM2022-05-10T13:47:06+5:302022-05-10T13:55:09+5:30

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

gujarat Congress Rahul Gandhi in adivasi satyagraha rally in dahod | "मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

"मोदी आले, नोटबंदी केली अन् तुमच्या खिशातून पैसा काढला, अब्जोपतींना फायदा झाला"

Next

नवी दिल्ली - गुजरातमध्ये या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमध्ये जोरदार तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे गुजरातच्या दाहोदमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी आदिवासी सत्याग्रह रॅलीला संबोधित केलं, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं की, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत मनरेगाची खिल्ली उडवली. तसेच मी हे रद्द करू इच्छितो पण नाही करणार कारण काँग्रेसने काय केलंय हे देशाला लक्षात राहिलं पाहिजे असं म्हटलं. याला राहुल यांनी उत्तर दिलं. 

आज जर कोरोनाच्या काळात मनरेगा नसती तर देशाची परिस्थिती काय झाली असती? असा सवाल राहुल यांनी विचारला आहे. तसेच कोरोनामुळे गुजरातमध्ये तीन लाख लोकांचा मृत्यू झाला. गंगा नदी मृतदेहाने भरून गेली. तर देशात ५०-६० लाख लोकांना जीव गमवावा लागला, पण हे लोक या गोष्टींवर अजिबात बोलत नाहीत. फक्त थाली बजाओ, लाईट जलाओ असं म्हणत आहेत. नोटबंदी आणि जीएसटीवरून देखील राहुल गांधी यांनी आता पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. 

"पंतप्रधान आले, नोटबंदी केली आणि तुमच्या खिशातून पैसा काढला. काळ्या पैशाविरोधात लढाई आहे असं सांगितलं, पूर्ण देशाला बँकेच्या लाईनमध्ये उभं केलं. पण काळ्या पैशाविरोधात काहीच नाही झालं. अब्जोपतींना फायदा झाला असं म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. ही जनसभा नाही हे आंदोलन आहे असंही म्हटलं आहे. मोदींनी देशाची दोन देशात वाटणी केली. पण काँग्रेस हे होऊ देणार नाही असं देखील राहुल यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे. "आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: gujarat Congress Rahul Gandhi in adivasi satyagraha rally in dahod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.