गेल्या काही काळामध्ये लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र अशा शस्त्रक्रिया कधीकधी जीवावरही बेतू शकतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रियेनंतर मेरठमधील एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या महिलेने एका खाजगी रुग्णालयातून लठ्ठपणा कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेतली होती. शस्त्रक्रिया केली तेव्हा या महिलेचं वजन १२३ किलो होतं. या शस्त्रक्रियेनंतर २४ तासांत तब्बल ३० किलो एवढं कमी होईल, अशी हमी डॉक्टरांनी दिली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर या महिलेचा मृत्यू झाला.
शस्त्रक्रियेदरम्यान, चूक झाल्याने महिलेच्या पोटामध्ये स्त्राव झाला. त्यामुळे संसर्ग होऊन महिलेचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत. आहे. बेरियाट्रिक सर्जरी ही लठ्ठपणामुळे त्रस्त अशलेल्या लोकांसाठी पर्याय मानला जातो. मात्र यामध्ये खूप गुंतागुंत आणि अनेक धोकेही असतात.
वजन कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेला बेरियाट्रिक सर्जरी असं म्हणतात. जेव्हा लठ्ठपणा हा जीवघेणा ठरण्याची शक्यता असते. व्यायाम आणि डायएटिंग यांच्या माध्यमातून तो कमी होण्याची शक्यता नसते तेव्हा ही शस्त्रक्रिया केली जाते. मात्र ही शस्त्रक्रिया सर्वांनाच करता येत नाही. त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार तंदुरुस्त असणं आवश्यक असतं.