नवी दिल्ली - सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी ही केवळ हरयाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांची मागणी नाही, तर ती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची आहे, असे संयुक्त किसान मोर्चाचे (एसकेएम) नेते जगजीतसिंह डल्लेवाल यांनी सोमवारी म्हटले आहे.
जंतरमंतर येथे आयोजित ‘किसान महापंचायत’मध्ये ते बोलत होते. या महापंचायतीत देशभरातून आलेले शेतकरी सहभागी झाले. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या ठिकाणी सुमारे १,२०० पोलिस तैनात केले आहेत.
तीन मागण्या कोणत्या? देशभरात सर्व पिकांसाठी एमएसपीची कायदेशीर गॅरंटी द्यावी.शेती, डेअरी, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन क्षेत्र अमेरिकेसोबतच्या कोणत्याही संभाव्य करारातून वगळावे.शेती कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी.
आजच्या महापंचायतीत आम्ही प्रयत्न केला की देशभरातील शेतकरी येथे येऊन आपली मागणी मांडतील... सरकारला आम्ही दाखवून द्यायचे आहे की एमएसपी ही मागणी फक्त पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांची नाही, तर देशातील सर्व शेतकऱ्यांची आहे.- जगजीतसिंह डल्लेवाल, शेतकरी नेते
चार वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी महापंचायतचार वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी ही महापंचायत शांततापूर्ण असेल. यात शेतकरी व समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ही महापंचायत २०२०-२१ मधील शेतकरी आंदोलनानंतर चार वर्षांनी होत आहे. तेव्हा हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते.