पंजाबमध्येभाजपाच्या एका नेत्याच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाल्याने खळबळ उजाली आहे, भाजपाचेपंजाबमधील जालंधर येथील नेते मनोरंजन कालिया यांच्या घराबाहेर ग्रेनेड फेकून रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.
जेव्हा हल्ला झाला तेव्हा कालिया हे घरी झोपले होते. मोठा आवाज झाल्याने ते खडबडून जागे झाले. काही वेळाने आपल्या घराबाहेर स्फोट झाल्याची कल्पना त्यांना आली. स्फोटाची माहिती मिळताच कालिया यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांना पोलीस ठाण्यात पाठवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. हा स्फोट झाला तिथून पोलीस ठाणे अवघ्या १०० मीटर अंतरावर आहे.
जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी सांगितले की, रात्री सुमारे १ वाजता आम्हाला स्फोटाची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. तसेच तपासाला सुरुवात केली. आता फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच आम्ही सीसीटीव्हींचीही पडताळणी करत आहोत. तर हा ग्रेनेड हल्ला होता की आणखी काही याचा तपास फॉरेन्सिक पथकाकडून केला जात आहे.
भाजपा नेते मनोरंजन कालिया यांनी या घटनेबाबत सांगितले की, रात्री सुमारे १ वाजण्याच्यादरम्यान स्फोट झाला. तेव्हा मी झोपलो होतो. मला वाटलं की, हा गडगडाटाचा आवाज आहे. नंतर मला समजलं की स्फोट झाला आहे. त्यानंतर मी माझ्या सुरक्षा रक्षकाला पोलीस ठाण्यात पाठवलं. आता सीसीटीव्हींची पाहणी केली जात आहे. तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञही घटनास्थळी उपस्थित आहेत.