योगगुरु अय्यंगार यांना गुगलचे डुडलमधून अभिवादन
By Admin | Updated: December 14, 2015 11:05 IST2015-12-14T11:05:48+5:302015-12-14T11:05:48+5:30
गुगलने आज जगप्रसिध्द योगगुरु बी.के.एस अय्यंगार यांच्या ९७ व्या जयंतीदिनी त्यांच्या सन्मानार्थ आपल्या होमपेजवर खास योगाचे डुडल ठेवले आहे.

योगगुरु अय्यंगार यांना गुगलचे डुडलमधून अभिवादन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - भारतातील प्रसिध्द व्यक्ती, घटना, सणांना डुडलच्या माध्यमातून सन्मान देणा-या गुगलने आज जगप्रसिध्द योगगुरु बी.के.एस अय्यंगार यांच्या ९७ व्या जयंतीदिनी त्यांच्या सन्मानार्थ आपल्या होमपेजवर खास योगाचे डुडल ठेवले आहे. यात गुगलने अय्यंगार यांना अॅनिमेटेड अवतारात योगा करताना दाखवले आहे.
१४ डिसेंबर १९१८ रोजी दक्षिण भारतातील कर्नाटकमध्ये अय्यंगार यांचा जन्म झाला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी म्हैसूरमध्ये योगा शिकण्यास सुरुवात केली. १९३७ साली वयाच्या १९ व्या वर्षी पुण्यामध्ये त्यांनी योगा शिकवण्यास सुरुवात केली. १९५४ पासून त्यांनी परदेशात योगप्रशिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या योग कौशल्याने अनेकांना प्रभावित केले. देशाप्रमाणे परदेशातही त्यांना मानणारा मोठा वर्ग तयार झाला.
२००४ साली टाईम नियतकालिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये बी.के.एस अय्यंगार यांचा समावेश केला होता. देशा-परदेशात त्यांनी केलेल्या योगाचा प्रसार लक्षात घेऊन २०१४ मध्ये केंद्र सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. २० ऑगस्ट २०१४ रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.