आंबा बागायतदारांना भरघोस मदत : मुख्यमंत्री

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:17+5:302014-05-12T19:48:17+5:30

-ज्या देशांनी आंबा नाकारला त्यांचे गैरसमज दूर करणार

Great help to mango growers: Chief Minister | आंबा बागायतदारांना भरघोस मदत : मुख्यमंत्री

आंबा बागायतदारांना भरघोस मदत : मुख्यमंत्री

-ज
्या देशांनी आंबा नाकारला त्यांचे गैरसमज दूर करणार
-फळप्रक्रिया उद्योग कोकणात येण्यासाठी अनुदान देणार
-आंबा, काजू बोर्डाला लवकरच निधी


दापोली : कोकणात अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्यातील इतर फळपिकांप्रमाणेच नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, कोकणातील शेतकर्‍यांना भरघोस मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दापोलीत पत्रकार परिषदेत जाहीर केले. ४२ वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषदेसाठी ते दापोलीत आले होते.
कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याचे पीक घेतो. मात्र, यावर्षी अवकाळी पाऊस व युरोप देशाने आंब्यावर घातलेल्या बंदीमुळे शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. देशातील केवळ तीन टक्के आंबा युरोपात जातो. युरोपमध्ये बंदी घालण्याचे काही कारण नव्हते; परंतु ही बंदी केवळ गैरसमजुतीतून झाली आहे. युरोपीय देशात राज्याचे एक शिष्टमंडळ पाठविण्यात आले आहे. लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.
कोकणातील हापूसला दुबईत चांगली बाजारपेठ मिळाली आहे. हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दुबईच्या मार्केटमध्ये दाखल झाला आहे. आखाती देशात अजून आंबा पाठवण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील दोन दिवसांत दुबईला रवाना होणार आहेत. दुबईतील आंबा आयात व्यापारी यांच्याशी चर्चा करून राज्यातील अधिक आंबा दुबईच्या बाजारपेठेत कसा जाईल, शेतकर्‍यांचे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत चर्चा करणार आहेत. ज्या देशांनी आंबा नाकारला, त्यांची गैरसमज दूर करण्याबरोबरच जे देश आंबा आयात करतात त्यांच्याशी व्यावसायिक संबंध दृढ करून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
कोकणातील आंबा, काजू बोर्डाला लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, कोकणातील शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही. वाशी मार्केट येथे फळप्रक्रिया युनिट व आंबा केंद्र स्थापन करून शेतकर्‍याला दिलासा देण्यात येणार आहे. आंबा-काजू बोर्ड रत्नागिरी येथे हलविण्यात आले नाही, तर बोर्ड दापोलीत ठेवायचे की, अन्य ठिकाणी याबाबत चर्चा सुरू आहे. कोकणातील फळपिकांवरील प्रकल्प कोकणात यावेत यासाठी अनुदान दिले जाईल.
या पत्रकार परिषदेला जलसंपदामंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चौकट
हापूसचे दर गडगडण्याची चौकशी होणार
देशात दर पडण्यासारखी कसल्याही प्रकारची परिस्थिती नसतानासुद्धा आंब्याचे दर का पडले? हे दर कोणी पाडले. दर पाडण्यामागे दलालांचे राजकारण आहे की, गैरसमजुतीतून दर पाडले गेले? ज्यांनी दर पाडले, त्यांनी हे दर का पाडले? याबाबत चौकशी केली जाईल. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक दीपक तावडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली असून, ही समिती चौकशी करून अहवाल सादर करेल व यामध्ये दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Great help to mango growers: Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.