नातवाने पत्नीची हत्या करून स्वत:ही जीवन संपल्याने शोकाकुल झालेल्या आजोबांनी पेटत्या चितेमध्ये उडी मारून जीवन संपवल्याची घटना मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सीधी जिल्ह्यातील बहरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहोलिया गावामध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ३४ वर्षीय अभयराज यादव याने त्याची पत्नी सविता यादव हिची हत्या केली होती. त्यानंतर अभयराज याने गळफास लावून जीवन संपवलं होतं.
दरम्यान, शुक्रवारी कायदेशीर प्रक्रिया आटोपल्यानंतर संध्याकाळी अभयराज आणि त्याच्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अंगाखांद्यावर खेळलेला नातू नजरेसमोर गेल्याने अभयराज यादव याचे आजोबा रामअवतार यादव यांना जबर मानसिक धक्का बसला. शोकाकुल झालेल्या रामअवतार यादव यांनी शनिवारी सकाळी नातवाच्या पेटत्या चितेमध्ये उडी मारून आपलं जीवन संपवलं.
दरम्यान, अभयराज यादव याने पत्नी सविता यादव हिची हत्या करून आपलं जीवन का संपवलं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. आता पोलीस अभयराज याने त्याच्या पत्नीची हत्या का केली, याचा शोध घेत आहेत. दरम्यान, एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोकाकुल वातावरण आहे.