मध्य प्रदेशच्या राज्यपालांना खुर्चीचा मोह
By Admin | Updated: March 4, 2015 00:17 IST2015-03-04T00:17:26+5:302015-03-04T00:17:26+5:30
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) भरती घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल होऊनही राज्याचे राज्यपाल राम नरेश यादव पदावर कायम आहेत़

मध्य प्रदेशच्या राज्यपालांना खुर्चीचा मोह
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) भरती घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल होऊनही राज्याचे राज्यपाल राम नरेश यादव पदावर कायम आहेत़ नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याचे केंद्राचे निर्देशही त्यांनी धुडकावून लावले आहेत़
राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत पाच दिवसांपासून यादव राजधानी दिल्लीत तळ ठोकून होते़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे त्यांनी भेटीची वेळ मागितली होती़ मात्र राष्ट्रपतींची वेळ न मिळाल्याने मंगळवारी अखेर ते भोपाळमध्ये परतले़
मध्य प्रदेश पोलिसांच्या विशेष कृतिदलाने यादव यांच्याविरुद्ध गत मंगळवारी गुन्हा दाखल केला होता़ यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे़ केंद्र सरकारनेही त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत़
संपुआ सरकारच्या कार्यकाळात २०११ मध्ये यादव यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१६ मध्ये संपणार आहे़
(लोकमत न्यूज नेटवर्क)