पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले-

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30

Governor goes back without seeing Palkhi- | पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले-

पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले-

>पालखीचे दर्शन न घेताच राज्यपाल परतले
-वारकर्‍यांचे आंदोलन: जिल्हाधिकार्‍यांची मध्यस्थीही अमान्य
पुणे: वारीदरम्यान चंद्रभागेचे वाळवंट खुले करावे या मागणीसाठी वारकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना आज संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखीचे दर्शन न घेताच पुण्यातून मुंबईला परतावे लागले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी म्हणूनच राज्यपाल आज खास पुण्यात आले होते. मात्र या आंदोलनामुळे त्यांना दर्शनाला मुकावे लागले.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्र वारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाल्या. या दोन्ही पालख्यांच्या दर्शनासाठी राज्यपाल संगमवाडीमध्ये जाणार होते. राज्यपालांच्या कार्यालयाकडून तसा कार्यक्र मही जाहीर करण्यात आला होता. मात्र, वारकरी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अहवाल स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर हा कार्यक्र म रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली.
याबाबत राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितले की जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी राज्यपालांना वारकर्‍यांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर राज्यपालांनी स्वत:च दर्शन घेता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. आपल्या येण्यामुळे तिथे काही गोंधळ होऊन त्याचा वारकर्‍यांना त्रास होणार असेल तर ते आपल्याला आवडणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे ते लगेचच मुंबईला रवाना झाले. आज सकाळी साडेबारा वाजताच ते पुण्यात आले होते. दर्शन न घेताच साडेचार वाजता ते मुंबईला परतले. (प्रतिनिधी)
.................................
वारकर्‍यांचे आंदोलन
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे वाळवंट आषाढी यात्रेच्या काळात वारकर्‍यांसाठी १५ दिवस खुले ठेवावे या मागणीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज अशा दोन्ही पालख्यांबरोबर असलेल्या वारकर्‍यांनी संगमवाडी येथे आंदोलन सुरू केले. चंद्रभागा नदीच्या या परिसराचा वापर करण्यास अलीकडेच न्यायालयाने मनाई केली आहे. ही मनाई उठवावी, त्यासाठी प्रसंगी कायद्यात बदल करावा अशी वारकर्‍यांची मागणी आहे. जिल्हा प्रशासनाला या आंदोलनाची पुर्वकल्पना असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव वारकरी संघटनांच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा करीत होते. मात्र या चर्चेला यश आले नाही.
...............................
मुद्दा नेमका काय आहे ?
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणार्‍या वारीदरम्यान मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रसारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते. वारकरयांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरु पात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारकर्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे.

Web Title: Governor goes back without seeing Palkhi-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.