सुषमांसाठी सरकारची बॅटिंग!
By Admin | Updated: June 16, 2015 04:26 IST2015-06-16T04:26:06+5:302015-06-16T04:26:06+5:30
कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी देशातून पलायन केलेले ‘आयपीएल’चे माजी कमिशनर ललित मोदी हे ‘वॉन्टेड’ गुन्हेगार असूनही त्यांना ब्रिटनमधून

सुषमांसाठी सरकारची बॅटिंग!
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी देशातून पलायन केलेले ‘आयपीएल’चे माजी कमिशनर ललित मोदी हे ‘वॉन्टेड’ गुन्हेगार असूनही त्यांना ब्रिटनमधून पोर्तुगालला जाता यावे यासाठी मदत करण्यावरून संपूर्ण मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत काँग्रेसने सोमवारीही जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर कठोर टीकेतून आणखी आक्रमकतेचे संकेत दिले. त्याचवेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्या टीकाकारांवर आक्रमकतेने प्रतिहल्ला केला.
रविवारी बचावात्मक भाषेत लागोपाठ डझनभर टिष्ट्वट करणाऱ्या सुषमा स्वराज यांनी सोमवारी एकदम पवित्रा बदलत ‘नैतिकतेचे धडे’ देणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांवर हल्ला करणाऱ्या टिष्ट्वट केल्या. एवढेच नव्हेतर, त्यांनी यासंदर्भात एका महिला पत्रकाराचा नावानिशीही उल्लेख केला. दुसरीकडे स्वराज यांचे खंदे समर्थक व भाजपाचे खासदार कीर्ती आझाद यांनी, स्वराज यांच्याविरुद्ध पालिकेची निवडणूकही जिंकू न शकणाऱ्या पक्षातीलच एकाने या बातम्या प्रसिद्धिमाध्यमांना पुरविल्याचा आरोप केला.
हा पक्षातील घरभेदी कोण याचा नामोल्लेख आझाद यांनी केला नसला तरी त्यांचा स्पष्ट रोख वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे होता. ‘आयपीएल’मध्ये ललित मोदींनी केलेले घोटाळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ज्या चौकशी समितीने बाहेर काढले त्यात जेटलीही होते. पण आझाद यांनी आडून केलेल्या या हल्ल्यावर स्वत: जेटली किंवा त्यांच्या समर्थकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
खरेतर, जेटली सोमवारी रात्री १० दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून २१ जूनला सॅन फ्रान्सिस्कोत जागतिक योगदिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
खटल्यांबाबत सरकार गप्प
ललित मोदींचा जप्त केलेला पासपोर्ट त्यांना परत देण्याचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी २७ आॅगस्ट रोजी दिला. पण त्याविरुद्ध मोदी सरकारने अपील न करणे हेही लक्षणीय आहे. खासकरून एकल न्यायाधीशांपुढे अपयश आल्यानंतर द्विसदस्यीय खंडपीठाने ललित मोदींच्या बाजूने निकाल दिला होता हे लक्षात घेता खरेतर अपील करण्यास भक्कम आधार होता. सुषमा स्वराज यांनी ‘मानवतावादी दृष्टिकोन’ ठेवला तरी सरकारला अपील करणे शक्य होते. पण तसे केले गेले नाही. परिणामी, ललित मोदींना मोकळीक मिळाली व ‘आयपीएल’मधील ४५० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यासंबंधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले खटले रखडले.
येत्या काही दिवसांत इतर घटनांच्या कालौघात सुषमा स्वराज यांच्यावरून उठलेले हे वादळ विरून जाईल, असे सरकारचे गणित आहे. शिवाय संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू व्हायला एक महिन्याहून अधिक अवधी असल्याने विरोधकांना तोपर्यंत या मोहिमेतील हवा टिकवून ठेवणेही कठीण जाईल.
युवक काँग्रेस आक्रमक
सोमवारी दुपारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत स्वराज यांच्या सफदरजंग लेन येथील निवासस्थानी धडक देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. स्वराज यांनी राजीनामा द्यावा किंवा पंतप्रधानांनी त्यांना मंत्रिमंडळातून तडकाफडकी बडतर्फ करावे असे नारे देत निदर्शकांनी स्वराज यांच्या प्रतिमाही जाळल्या.
पाठिंब्यासाठी जुळवाजुळव
औचित्याला सोडून केलेल्या या कथित कृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी सुषमा स्वराज यांना ‘बळीचा बकरा’ करणार नाहीत, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले. सरकार स्वराज यांच्यामागे ठामपणे उभे राहिले असून, त्यांच्यासाठी पाठिंब्याचीही जुळवाजुळव करीत आहे.
विरोधाची धार एकाकीच!
-काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून घरली असली तरी यात इतर विरोधी पक्षांना आपल्यासोबत आणण्यात मात्र काँग्रेसला यश आलेले नाही.
-या प्रकरणी डावे पक्ष व तृणमूल काँग्रेसने सावधपणे प्रतिक्रिया दिली व स्वराज यांच्या राजीनाम्याचा उल्लेखही केला नाही.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले. पण जदयूचे दिल्लीतील नेते मात्र थेट हल्ला करण्याचे टाळत असल्याचे जाणवले.
- सोमवारी दुपारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत स्वराज यांच्या सफदरजंग लेन येथील निवासस्थानी धडक देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले.
स्वराज यांचा राजीनामा मागणाऱ्या काँग्रेसने आधी त्यांचे नेते कोणत्या देशात सुटीवर गेले आणि कोणत्या व्हिसावर गेले होते, ते जाहीर करावे. काँग्रेस नेत्यांचेही फोटो अनेक घोटाळ्यांतील आरोपींसोबत आहेत, त्याचे काय?- प्रकाश जावडेकर