सरकार व्हीआयपी सुरक्षेचा फेरआढावा घेणार
By Admin | Updated: July 3, 2014 05:10 IST2014-07-03T05:10:35+5:302014-07-03T05:10:35+5:30
केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आधीच्या संपुआ सरकारने सुरक्षा दिलेल्या १५० हून अधिक अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार आहे.

सरकार व्हीआयपी सुरक्षेचा फेरआढावा घेणार
नवी दिल्ली : केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर आधीच्या संपुआ सरकारने सुरक्षा दिलेल्या १५० हून अधिक अतिविशिष्ट व्यक्तींच्या सुरक्षेचा फेरआढावा घेणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन १४ आॅगस्टला संपत आहेत. त्यानंतर सर्व अतिविशिष्ट व्यक्तींना असलेल्या धोक्याचा फेरआढावा घेण्यात येईल आणि राजकीय वजन वापरून सुरक्षा मिळवलेल्यांची नावे व्हीआयपी यादीतून वगळण्यात येतील, असे गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळात ज्या नेत्यांना ‘वाय, झेड किंवा झेड-प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यात आली. त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट, मनीष तिवारी, बेनीप्रसाद वर्मा, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचा समावेश आहे.
संपुआ सरकारच्या कार्यकाळात पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पी. एस. बाजवा, पक्षाचे अलाहाबादचे लोकसभा उमेदवार नंदगोपाल गुप्ता, उत्तर प्रदेश काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते प्रदीप माथुर, पत्रकार अनिरुद्ध बहल आणि माजी केंद्रीय मंत्री माटंगसिंग यांना सुरक्षा देण्यात आली.
शिंदे यांच्या कार्यकाळात भाजपा नेते शाहनवाज हुसेन आणि राजीव प्रताप रुडी, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना ‘झेड’ सुरक्षा प्रदान करण्यात आली.
आतापर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही; पण सर्व अतिविशिष्ट व्यक्तींना असलेल्या धोक्याचा फेरआढावा घेतला जाईल आणि त्यानुसार त्यांना सुरक्षा दिली जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)