'अच्छे दिन'साठी सरकार योग्य मार्गावर - आडवाणींची कौतुकसुमने
By Admin | Updated: November 22, 2015 18:32 IST2015-11-22T16:54:14+5:302015-11-22T18:32:43+5:30
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आज मात्र 'अच्छे दिन'साठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार योग्य मार्गावर जात असल्याचे सांगत सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

'अच्छे दिन'साठी सरकार योग्य मार्गावर - आडवाणींची कौतुकसुमने
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २२ - बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या दारूण पराभवानंतर मोदींसह इतर नेत्यांवर टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आज मात्र 'अच्छे दिन'साठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार योग्य मार्गावर जात असल्याचे सांगत सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सध्या डाळींच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेले 'अच्छे दिन'चं वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे का असा प्रश्न आडवणांनी विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले ' यंत्रणेतमध्ये बदल घडवण्यास थोडा वेळ लागतो यावर असं मला वाटतं. सरकार योग्य मार्गाने जात असून त्याचा परिणामही चांगला असेल यावर माझा विश्वास आहे.' दरम्यान गुजरातमधील सहा महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरु असून या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळेल असा विश्वासही अडवाणी यांनी यावेळी व्यक्त केला.
बिहारमधील भाजपाच्या पराभवानंतर अडवाणींसह मुरली मनोहर जोशी, शांता कुमार आणि यशवंत सिन्हा या वरिष्ठ नेत्यांनी भाजपवरच तीव्र शब्दांत टीका केली होती, मात्र आज अचानक आडवाणींनी सरकारचे कौतुक केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले.