सरकार नमले; जाटांना अखेर ओबीसी आरक्षण
By Admin | Updated: February 22, 2016 04:26 IST2016-02-22T04:26:39+5:302016-02-22T04:26:39+5:30
ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनासमोर नमते घेत रविवारी केंद्र सरकारने मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

सरकार नमले; जाटांना अखेर ओबीसी आरक्षण
नवी दिल्ली/ चंदीगड : ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे या मागणीसाठी जाट समाजाने पुकारलेल्या आंदोलनासमोर नमते घेत रविवारी केंद्र सरकारने मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान या आंदोलनाचे लोण उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्येही पोहोचले. झज्जर गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या चौघांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यात रविवारी आणखी दोघांची भर पडल्यामुळे मृतांची संख्या १२ झाली आहे.
संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांच्या नेतृत्वातील समिती केंद्रीय नोकऱ्यांत या समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्याचा अभ्यास करेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी दिल्लीत केली.
रेल्वेला फटका
जाट आंदोलनाचा उत्तरेकडील राज्यांमधील रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. सुमारे ७३६ रेल्वे रद्द केल्या असून, १०५ गाड्या अन्य मार्गाने वळत्या केल्या. रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, वाहतूकदारांना सुमारे २०० कोटींचा फटका बसला. पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर या राज्यांकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील सेवा ठप्प झाल्या आहेत.