भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 09:05 AM2018-04-05T09:05:48+5:302018-04-05T09:05:48+5:30

प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

Government plans 14000 bunkers to shield civilians from Pakistan fire | भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

Next

जम्मू-काश्मीर: पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे येथील अनेक गावांतील लोकांचा नाहक बळी जातो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात तब्बल 14,000 बंकर्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये सांबा, पुंछ, जम्मू, कटुआ आणि राजौरी परिसराचा समावेश आहे. पाकिस्तानकडून करण्यात येणारा गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यामुळे हा परिसर सर्वाधिक वेळा लक्ष्य केला जातो. त्यामुळे येथील नागरिक गंभीररित्या जखमी होण्याचे प्रकार सर्रास घडतात, अनेकांचा तर जीवही जातो. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने आपातकालीन परिस्थितीत नागरिकांना लपण्यासाठी मोठ्याप्रमाणावर बंकर्स तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 13,029 बंकर्स हे नागरिकांच्या घरासमोर उभारण्यात येतील तर उर्वरित 1,431 बंकर्स हे सार्वजनिक स्वरूपाचे असतील. या बंकर्सचे क्षेत्रफळ साधारण 800 स्क्वेअर फूट इतके असेल. प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा झाल्यास नागरिक याठिकाणी सुरक्षित राहू शकतील. 

पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात 2017मध्ये  19 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याशिवाय हल्ल्यांमध्ये सीमेवरील गावांमधील 12 नागरिक ठार झाले होते, तर 79 जण जखमी झाले होते. याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने सीमावर्ती भागांमध्ये बंकर्स उभारण्याचा 416 कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. या बंकर्सचे काही सुटे भाग कारखान्यात तयार करण्यात येतील. हे भाग ट्रेलर आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने संबंधित गावांमध्ये नेले जातील आणि त्याठिकाणी बसवले जातील. प्रत्येक बंकरची 2 ते 3 दिवसांत उभारणी करण्याचे लक्ष्य आम्ही समोर ठेवल्याची माहिती बंकर उभारणीचे कंत्राट देण्यात आलेल्या एनबीसीसीने सांगितले. 

Web Title: Government plans 14000 bunkers to shield civilians from Pakistan fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.