गोवा मंत्र्यांची सरकारी खर्चाने जगसफर!
By Admin | Updated: June 18, 2014 04:29 IST2014-06-18T04:29:16+5:302014-06-18T04:29:16+5:30
गोयंकारांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. कशाचीही पर्वा न करता गोव्यातील मंत्री व आमदार वारंवार सरकारी खर्चाने जगसफर करीत असल्याचे आढळून आले.

गोवा मंत्र्यांची सरकारी खर्चाने जगसफर!
सद्गुरू पाटील, पणजी
गोयंकारांनी टीका करो किंवा ‘कॅग’ने आक्षेप घेवो. कशाचीही पर्वा न करता गोव्यातील मंत्री व आमदार वारंवार सरकारी खर्चाने जगसफर करीत असल्याचे आढळून आले.
सरकारी खर्चाने ब्राझिलच्या दौऱ्यावर जाण्याचा विषय गोव्याच्या काही मंत्री व आमदारांच्या नुकताच अंगलट आला. त्यावर देशभरातून टीका झाल्याने सरकारी खर्चाने ब्राझिलला जाणार नाही, असे त्यांना सांगावे लागले. काही वरिष्ठ अधिकारीही वारंवार विदेश दौरे करत आहेत. त्यातच आता पर्यटन खाते मोठा खर्च करून युरोपचा दौरा करणार आहे. सेंट झेवियरचे पार्थिव प्रदर्शन येत्या नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणार आहे. दर १० वर्षांनी हा सोहळा होतो. यापूर्वी गोवा सरकारने कधीच या सोहळ्याबाबत परदेशात जागृती केली नाही. मात्र आता सरकारमधील काही मान्यवरांना युरोपमध्ये फिरण्याची व तेथे रोड शो करण्याची हौस आली आहे. या मोहिमेची तयारी सध्या सुरू आहे.
कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी यापूर्वी जर्मनीमध्ये मोठमोठी पथके पाठविण्यात आली होती. त्यावर काही कोटींचा खर्च झाला. उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी असा लवाजमा जर्मनीला जाऊन तेथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पाहून आला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे पोर्तुगालच्या दौऱ्यावर गेले होते.