सरकारी मालमत्तांचा मोती नाकापेक्षा जड!
By Admin | Updated: March 16, 2015 23:35 IST2015-03-16T23:35:47+5:302015-03-16T23:35:47+5:30
मालकीच्या वाहनांचे पुस्तकी मूल्य सरकारी मालकीचे रस्ते व पूल यांच्याहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पासोबत मांडलेल्या कागदपत्रांतून उघड झाली आहे.

सरकारी मालमत्तांचा मोती नाकापेक्षा जड!
नवी दिल्ली : देशभरातील केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनांचे पुस्तकी मूल्य सरकारी मालकीचे रस्ते व पूल यांच्याहून अधिक असल्याची धक्कादायक माहिती संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पासोबत मांडलेल्या कागदपत्रांतून उघड झाली आहे.
दरवर्षीच्या अर्थसंकल्पासोबत केंद्र सरकारचे ‘अॅसेट रजिस्टर’ही संसदेत मांडले जाते. यात केंद्र सरकारच्या मालकीच्या देशभरातील मालमत्तांचा तपशील व त्यांचे अद्ययावत पुस्तकी मूल्य (बूक व्हॅल्यू) दिलेले असते. यंदा सादर झालेल्या ‘अॅसेट रजिस्टर’मधील आकडेवारी अनेक दृष्टींनी धक्कादायक आहे.
या आकडेवारीनुसार देशभरातील केंद्र सरकारी कार्यालयांमधील संगणक, छायाप्रती काढण्याची यंत्रे व अन्य कार्यालयीन साधनांचे मूल्य सरकारी मालकीचे रस्ते, पूल व पाटबंधारे प्रकल्पांहून जास्त आहे. खरे तर कार्यालयीन साधनसामुग्रीचे मूल्य केंद्र सरकारच्या मालकीच्या कार्यालयीन व निवासी इमारतींच्या मूल्याहून थोडेसेच कमी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारची वाहने सरकारी मालकीच्या रस्त्यांहून अधिक मूल्यवान आहेत! (लोकमत न्यूज नेटवर्क)
(आकडे कोटी रुपयांत)
एकूण मालमत्ता १०,३१,१३९
स्थावर मालमत्ता ०४,०६,१२९
वित्तीय मालमत्ता ०६,२५,०१०
कार्यालयीन साधने ४०,७३१
रस्ते १०,२५६
पूल ११,७१७
पाटबंधारे प्रकल्प १,४१६
विद्युत प्रकल्प ३६८
वाहने ४३,५५४