गोरक्षकांचा हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला खून
By Admin | Updated: August 18, 2016 16:52 IST2016-08-18T16:43:44+5:302016-08-18T16:52:02+5:30
वंश हत्येवर बंदी घातलेली असतानाच उपडीमध्ये गायींची अवैध वाहतूक करणा-या दोन व्यक्तींवर हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला चढवला

गोरक्षकांचा हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला खून
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - गोवंश हत्येवर बंदी घातलेली असतानाच उडपीमध्ये गायींची अवैध वाहतूक करणा-या दोन व्यक्तींवर हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. उडपी जिल्ह्यातील हेबरीजवळील काजिके येथे एक व्हॅनमधून तीन गायी अवैधरीत्या नेत असतानाच हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी ती व्हॅन रोखली आणि व्हॅनचालकासह असणा-या दुस-या व्यक्तीला बेदम मारहाण केली. हे दोघे जण भाजपाचे सदस्य असल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते आहे.
पोलीस अधीक्षक के. टी. बालाकृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण पुजारी (29), अक्षय (22) हे दोघे जण एक व्हॅनमधून तीन गायींची वाहतूक करत होते. दरम्यान या घटनेची माहिती हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना समजली आणि त्यांनी रात्री 8.30च्या सुमारास कजीके येथे ही व्हॅन अडवून व्हॅनमधील व्यक्तींना मारहाण केली. ते दोघे त्या गायी कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचा आरोप हिंदू जागरण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला.
हल्ल्यात एका जखमीला ब्रह्मवर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र दुसरा प्रवीण पुजारी याचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. पोलिसांना रात्री 11 वाजता या घटनेची माहिती समजली असून, हत्येप्रकरणी हिंदू जागरण वेदिकेचा कार्यकर्ता श्रीकांतसह 16 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ब्रह्मवर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केल्याची माहिती बालाकृष्णन यांनी दिली आहे.