गुगलचं मिशन: मेक इन इंडिया, फॉर इंडिया
By Admin | Updated: December 16, 2015 14:27 IST2015-12-16T14:27:44+5:302015-12-16T14:27:44+5:30
हैदराबादमध्ये खास भारतीयांसाठी नवीन उत्पादन निर्मितीचं लक्ष्य ठेवत इंजिनीअर्सची भरती करण्याचे आणि मेक इन इंडिया फॉर इंडियाचं ब्रीद प्रत्यक्षात उतरवण्याचे संकेत गुगलने दिले आहेत

गुगलचं मिशन: मेक इन इंडिया, फॉर इंडिया
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - हैदराबादमध्ये खास भारतीयांसाठी नवीन उत्पादन निर्मितीचं लक्ष्य ठेवत इंजिनीअर्सची भरती करण्याचे आणि मेक इन इंडिया फॉर इंडियाचं ब्रीद प्रत्यक्षात उतरवण्याचे संकेत गुगलने दिले आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई तीन दिवसांच्या भारत दौ-यावर असून प्रसारमाध्यमे, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, उद्योजक आदींच्या ते भेटीगाठी घेत आहेत. एका कार्यक्रमात बोलताना पिचाई यांनी दर महिन्याला लाखोंच्या संख्येने भारतीय ऑनलाइन युजर्सची संख्या वाढत असल्याचे सांगत डिजिटल क्रांतीमध्ये भारताचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.
सुंदर पिचाईंनी सांगितलेल्या व भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पाच गोष्टी:
- येत्या तीन वर्षांमध्ये ३ लाख गावातल्या महिलांना ऑनलाइन येण्यासाठी गुगल सहाय्य करणार.
- हैदराबादच्या कार्यालयामध्ये इंजिनीअर्सची संख्या वाढवून मेक फॉर इंडियाला चालना देणार.
- डिसेंबर २०१६ पर्यंत १०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा कार्यान्वित होणार. जगामधला हा सगळ्यात मोठा वायफाय प्रकल्प आहे.
- मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये पब्लिक वायफायची सुविधा जानेवारी २०१६मध्ये सुरू होणार.
- साध्या गुगल सर्चच्या माध्यमातून क्रिकेटचे लाइव्ह अपडेट देणार.