गुगल मॅपिंग सीबीआय चौकशीच्या फे-यात
By Admin | Updated: July 28, 2014 02:42 IST2014-07-28T02:42:22+5:302014-07-28T02:42:22+5:30
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेअर जनरलच्या कार्यालयाने केंद्रीय गृहमंत्रालयास दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ही पीई दाखल केली आहे़

गुगल मॅपिंग सीबीआय चौकशीच्या फे-यात
नवी दिल्ली : संरक्षण प्रतिष्ठाने, तसेच संवेदनशील भागांचे नकाशे तयार करून(मॅपिंग) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीबीआयने गुगल या इंटरनेट कंपनीविरुद्ध ‘मैपाथॉन २०१३’ स्पर्धेसंदर्भात प्राथमिक चौकशी(पीई) दाखल केली आहे़
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेअर जनरलच्या कार्यालयाने केंद्रीय गृहमंत्रालयास दिलेल्या तक्रारीच्या आधारावर सीबीआयने ही पीई दाखल केली आहे़ गुगलने देशाच्या नकाशात सामील नसलेल्या अनेक क्षेत्रांचे मॅपिंग केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे़ गुगलने फेबु्रवारी-मार्च २०१३ मध्ये ‘मैपाथॉन २०१३’ या स्पर्धेचे आयोजन केले होते़ या स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी गुगलने ‘सर्व्हे आॅफ इंडिया’(एसओआय) या देशाच्या अधिकृत मॅपिंग संस्थेची कुठलीही परवानगी घेतली नव्हती़ या स्पर्धेत नागरिकांना आपल्या शेजारचे विशेषत: रुग्णालये, हॉटेल संबंधित ठिकाणांचा तपशील मॅपिंगसाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते़ यामुळे चिंतीत एसओआयने गुगलने ‘मैपाथॉन २०१३’ द्वारे मिळविलेला तपशील देण्यास सांगितले़ अनेक संवदेशनशील संरक्षण प्रतिष्ठानांचा आजपर्यंत जाहीर न झालेला तपशील असल्याचे एसओआयला आढळले़ गृहमंत्रालयाकडे केलेल्या तक्रारीत एसओआयने याकडे लक्ष वेधले आहे़ दिल्ली पोलिसांद्वारे प्राथमिक चौकशी केल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते़ कारण या तपासात देशाच्या विविध स्थानांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे़ गुगल अमेरिकन कंपनी असल्याने या तपासात एफबीआयच्या मदत घेतली जाऊ शकते़
गुगल म्हणते...
दरम्यान या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया देताना गुगल इंडियाने, आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे़ आम्ही राष्ट्रीय कायदे आणि सुरक्षेला गंभीरपणे घेतो़ आम्हाला कुठल्याही गोपनीय मुद्यांबाबत माहिती नाही़ आमच्याकडे असलेला संपूर्ण तपशील आम्ही पुरविलेला आहे़ याउपर आमच्याकडे कुठलीही माहिती नाही, असेही गुगलने स्पष्ट केले आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)