नवी दिल्ली : इंटरनेट सर्च कंपनी गुगलला अनेकदा इशारा देऊनसुद्धा ही कंपनी गोपनीय सामग्रीने इंटनेटला ‘प्रदूषित’ करीत आहे, असे भारतीय सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे. गोपनीय क्षेत्रांना आपल्या मानचित्रावर सादर केल्याप्रकरणी गुगलविरुद्ध प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने भारतीय सर्वेक्षण विभागाची मदत घेतली आहे. यासंदर्भातील चौकशी सुरू आहे. दरम्यान,भारताचे महासर्वेक्षक स्वर्ण सुब्बा राव यांनी आरोप केला की, इशारा दिल्यावरदेखील गुगलने गोपनीय क्षेत्रांचा इंटरनेटवर उल्लेख करण्याचे थांबवले नाही. गुगलने मॅपाथन २०१३ सरावादरम्यान बरीच गोपनीय सामग्री गोळा केली. याबद्दल आम्हाला कळले असता, आम्ही त्यांना असे न करण्याची सूचना केली. गुगलने सूचनांचे पालन केले नाही आणि नकाशावर गोपनीय क्षेत्रांचा उल्लेख करून ‘इंटरनेटला प्रदूषित’ केले, असे राव म्हणाले. गुगलने माझ्याशी हॉटेलमध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु मी त्यांना कार्यालयात येण्यास सांगितले. भारतीय सर्वेक्षण विभाग देशातील अधिकृत मानचित्र (मॅपिंग) संस्था आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गुगलने केले इंटरनेटला प्रदूषित
By admin | Updated: August 11, 2014 01:13 IST