गुड न्यूज...रेल्वेचीही कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा
By Admin | Updated: February 3, 2015 14:29 IST2015-02-03T14:10:28+5:302015-02-03T14:29:40+5:30
क्रेडीट अथवा डेबिट कार्ड नसणा-या प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने आता कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

गुड न्यूज...रेल्वेचीही कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - क्रेडीट अथवा डेबिट कार्ड नसणा-या प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने आता कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक केल्यावर घरपोच तिकीट मिळणार असून घरी तिकीट आल्यावर प्रवाशांना त्याचे पैसे देणे शक्य होणार आहे.
आरक्षण खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) माध्यमातून ऑनलाइन रिझर्वेशनची सुविधा सुरु केली होती. यामध्ये प्रवाशांना घर बसल्या इंटरनेटद्वारे तिकीट बुक करणे शक्य झाले होते. त्यासाठी प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करावे लागत होते. ज्या प्रवाशांकडे क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्ड नसतील त्यांना या सुविधेचा लाभ घेता येत नव्हता. यावरही रेल्वेने आता तोडगा काढला आहे.
भारतीय रेल्वेतर्फे लवकरच कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा सुरु केली जाणार आहे. यामध्ये प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करता येईल व त्याचे पैसे तिकीट घरपोच आल्यानंतर देता येतील. ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर देशभरातील २०० शहरांमध्ये राबवली जाणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्रवासाच्या किमान पाच दिवसांपूर्वी रिझर्वेशन बुक करणे बंधनकारक राहील. कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये प्रवाशांना स्लीपरक्लासच्या एका तिकीटासाठी ४० रुपये तर एसी वर्गातील एका तिकीटासाठी ६० रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. bookmytrain.com या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.