Pahalgam Terrorist Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पर्यटनासाठी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला असून २० पर्यटक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव आणि धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. कर्नाटकच्या एका व्यक्तीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकाची हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीला धमकावले.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे कर्नाटकातील शिवमोगा येथील एका व्यक्तीचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले मंजुनाथ हे त्यांची पत्नी पल्लवी आणि त्यांच्या लहान मुलासह पहलगाम येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. यावेळी दहशतवाद्यांनी बेसरन परिसरात त्यांच्यासह इतर पर्यटकांवर गोळीबार केला. यात मंजुनाथ यांचा मृत्यू झाला.
पल्लवी यांनी या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. "आम्ही तिघे मी, माझा पती आणि आमचा मुलगा काश्मीरला गेलो होतो. दुपारी १.३० च्या सुमारास हे सगळे घडले. आम्ही पहलगाममध्ये होतो. माझ्या डोळ्यांसमोर त्याचा जागीच मृत्यू झाला. ते अजूनही वाईट स्वप्नासारखे वाटत आहे. हल्ल्यानंतर लगेचच स्थानिक लोक माझ्या मदतीसाठी पुढे आले आणि तीन स्थानिक लोकांनी माझा जीव वाचवला," असे पल्लवी यांनी सांगितले.
"तीन-चार दहशतवाद्यांना हिंदूंना लक्ष्य करत हा हल्ला केला. मी त्यांना म्हणाले की, मलाही मारून टाका, तुम्ही माझ्या पतीला आधीच मारले आहे. त्यापैकी एक म्हणाला, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जा आणि हे मोदींना सांगा," असेही पल्लवी यांनी म्हटलं.