उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा द्या : पासवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 03:56 IST2018-09-12T03:56:45+5:302018-09-12T03:56:57+5:30
उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले.

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा द्या : पासवान
नवी दिल्ली : उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले. अशा राखीव जागा दिल्या, तर ५० टक्के राखीव जागांचे उल्लंघन होणार नाही का, असे विचारले असता पासवान म्हणाले की, तामिळनाडूत ६९ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.
सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवले, तर प्रश्न निर्माण होणार नाही. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर सरकारने घेतलेली भूमिका आणि सरकारी नोकरीतील बढतीत राखीव जागा, यावरून जोरदारपणे होणारा निषेध सरकारसाठी काळजीचा विषय आहे का? यावर पासवान म्हणाले की, अजिबात नाही.
सहा महिन्यांपूर्वी आम्ही बऱ्याच निषेधाला तोंड दिलेले आहे. मंत्र्यांना बाहेर पडणे अवघड बनले होते. मोदी सरकार हे दलितविरोधी व मागासवर्गाच्या विरुद्ध असल्याचे म्हटले गेले. लोक मला विचारायचे की, पासवानजी तुम्ही दलितांच्या हितांचे रक्षणकर्ते असूनही गप्प का? त्यानंतर यावर तोडगा काढला. (वृत्तसंस्था)
>प्रतिमा बदलली
दलितविरोधी अशी सरकारची प्रतिमा ६ महिन्यांत कशी बदलली, असे विचारताच पासवान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा ही सरकारसाठी परीक्षाच होती. तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.
अध्यादेश योग्य दिवशी जारी केला असता तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती. आम्ही गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अध्यादेश तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला.