काश्मीरमध्ये लष्कराला कारवाईचे स्वातंत्र्य द्या- मुलायम सिंह यादव
By Admin | Updated: June 26, 2017 21:29 IST2017-06-26T21:29:38+5:302017-06-26T21:29:38+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे

काश्मीरमध्ये लष्कराला कारवाईचे स्वातंत्र्य द्या- मुलायम सिंह यादव
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 26 - जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे, असं मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मांडलं आहे. ईदच्या निमित्तानं लखनऊमधल्या ऐशबाग इथल्या ईदगाह येथे आलेले मुलायम सिंह यादव बोलत होते. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित व्हावी आणि फुटीरतावादी नेत्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कराला मोकळीक देणे गरजेचे आहे.
काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांचे समर्थकच लष्करावर दगडफेक करतात. तसेच आतापर्यंत लष्कराचे अनेक मोठे अधिकारी आणि पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे फुटीरतावादी नेत्यांचाच हात आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी घुसतात आणि आपल्या जवानांचा शिरच्छेद करतात. फुटीरतावादी नेत्यांवर कारवाई तर होत नाहीच, मात्र दहशतवाद्यांचीही समस्या अद्याप संपली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचं मत मुलायम सिंह यांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय लष्कराला जम्मू-कश्मीरमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी, तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सूट दिली पाहिजे. फुटीरतावाद्यांना वठणीवर आणण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, असं मुलायमसिंह यादव म्हणाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.