आमच्या विरोधात पुरावे द्या अन्यथा घर जाळू - श्रीराम सेनेची कन्नड लेखकांना धमकी
By Admin | Updated: September 20, 2015 20:25 IST2015-09-20T20:24:57+5:302015-09-20T20:25:12+5:30
हिंदुत्ववादी संघटना श्रीराम सेनेने कन्नड भाषिक लेखक चेन्नावीरा कनावी आणि गोविदराजू यांना धमकीचे पत्र पाठवले आहे.

आमच्या विरोधात पुरावे द्या अन्यथा घर जाळू - श्रीराम सेनेची कन्नड लेखकांना धमकी
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. २० - कर्नाटकमध्ये ज्येष्ठ विचारवंत व पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच हिंदुत्ववादी संघटना श्रीराम सेनेने कन्नड भाषिक लेखक चेन्नावीरा कनावी आणि गोविदराजू यांना धमकीचे पत्र पाठवले आहे. कलबुर्गी हत्याप्रकरणात आमचा सहभाग असल्याचे पुरावे असल्यास ते उघड करा अन्यथा तुमचे घर जाळू अशा धमकीचे पत्रच श्रीराम सेनेने या लेखकांना पाठवले आहे.
कलबुर्गी हत्येत हिंदूत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप होत असून या हत्येत श्रीराम सेनेचा हात असावा असा संशयही काही लेखकांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर श्रीराम सेनेने कनावी व गोविंदराज यांना धमकीचे पत्र पाठवले आहे. 'आमच्यावर कलबुर्गी यांच्या हत्येचे आरोप करु नये, आरोप केल्यास आमच्याविरोधात पुरावे समोर मांडा अन्यथा नुकसान सोसण्यास तयार राहा' असे या पत्रात म्हटले आहे. श्रीराम सेनेच्या रायचूर युनिटतर्फे हे पत्र पाठवण्यात आल्याचे समजते.