नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्यायला उशीरच - सी के बोस
By Admin | Updated: August 10, 2014 18:41 IST2014-08-10T18:40:17+5:302014-08-10T18:41:15+5:30
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न द्यायला उशीरच - सी के बोस
ऑनलाइन टीम
कोलकाता, दि. १० - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भारत्न रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे वृत्त समोर येत असतानाच नेताजींच्या नातेवाईकांनी याविषयी नाराजी दर्शवली आहे. नेताजींना भारतरत्न देण्यास उशीर झाला असून आता केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न देण्याऐवजी त्यांच्या बेपत्ता प्रकरणातील गोपनीय दस्तावेज उघड करावे अशी मागणी नेताजींच्या नातेवाईकांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह पाच जणांची भारत रत्न पुरस्कारासाठी शिफारस केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर नेताजींचे पणतू चंद्रकुमार बोस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सन्मान करायचा असेल तर त्यांनी नेताजींच्या बेपत्ता होण्याचे गुढ उकलावे. नेताजींच्या बेपत्ता होण्यासंदर्भातील सुमारे १०० गोपनीय फाईल्स केंद्र सरकारकडे पडून आहेत. ही सर्व कागदपत्र जनतेसाठी उघड करा आणि त्यामुळे सत्य सर्वांसमोर येईल. नेताजींच्या बेपत्ता होण्यामागचे गुढ उकलण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे अशी मागणीही त्यांनी केली. नेताजींना भारत रत्न पुरस्कार देण्यास उशीर झाला अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहेत. विश्व रत्न पुरस्कार असता तर तो नेताजींना मिळाला असता असे सुगाता बोस यांनी सांगितले.