मुलींना विषारी औषध पाजून मातेचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 25, 2016 23:56 IST2016-05-25T22:59:54+5:302016-05-25T23:56:57+5:30
दिंडोरीतील घटना : दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू, आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

मुलींना विषारी औषध पाजून मातेचा आत्महत्त्येचा प्रयत्न
दिंडोरीतील घटना : दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू, आईवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू
नाशिक : वर्षभरापूर्वीच पतीचा मृत्यू झालेल्या विधवेने आपल्या अकरा महिन्यांच्या जुळ्या मुलींना विषारी औषध पाजून स्वत:ही आत्महत्त्येचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़२५) सायंकाळच्या सुमारास दिंडोरीतील कादवानगरमध्ये घडली़ यामध्ये या दोन्ही जुळ्या मुलींचा मृत्यू झाला असून, मातेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़
दिंडोरीमधील कादवानगरमधील रहिवासी अनिता पगारे (३०) या महिलेचा पती प्रदीप पगारे याचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर अनिता मुुंबई सोडून आपल्या दोन्ही जुळ्या मुली शर्वरी व शलाका यांना घेऊन दिंडोरीला वडिलांकडे राहण्यासाठी आल्या़ बुधवारी सायंकाळच्या सुमारास अनिता पगारे यांनी दोन्ही मुली शर्वरी व शलाका यांना विषारी औषध पाजले व स्वत:ही प्राशन केले़ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांची ही बाब लक्षात आली़ त्यांनी या तिघांनाही तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़
दिंडारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असतानाच जुळ्या मुलींमधील शर्वरीचा मृत्यू झाला़ तर दुसरी मुलगी शलाका व अनिता यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले़ या ठिकाणी शलाकाचा मृत्यू झाला, तर अनिता पगारे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ उच्चशिक्षित असलेल्या अनिता पगारे यांनी इतके कठोर पाऊल का उचलले याबाबत कुटुंबीय अनभिज्ञ आहेत़ या घटनेमुळे कादवानगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, या घटनेची दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
--इन्फो--
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता पगारे या पतीच्या मृत्यूनंतर कोलमडून गेल्या होत्या़ आपल्या दोन्ही जुळ्या मुलींचे पुढे कसे होणार याबाबत त्या सतत चिंतेत होत्या़ वडिलांकडे राहात असलेल्या अनिता पगारे या एमए बीएड अर्थात उच्चशिक्षित असल्याने त्या अशाप्रकारे पाऊल उचलतील अशी यत्किंचितही शंका त्यांच्या आई-वडिलांना नव्हती़