मुलींनी वॉट्स अॅप वापरु नये - खाप पंचायतीचे फर्मान
By Admin | Updated: November 19, 2014 18:43 IST2014-11-19T15:05:05+5:302014-11-19T18:43:38+5:30
उत्तरप्रदेशमधील खाप पंचायतीने मुलींनी फेसबूक आणि वॉट्स अॅप वापरु नये असे फर्मान काढले असून जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये हे फर्मान लागू करण्यात आले आहे.

मुलींनी वॉट्स अॅप वापरु नये - खाप पंचायतीचे फर्मान
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. १९ - खाप पंचायतीची तालिबानी फर्मान काढण्याची मालिका अजूनही सुरु असून उत्तरप्रदेशमधील खाप पंचायतीने मुलींनी फेसबूक आणि वॉट्स अॅप वापरु नये असे फर्मान काढले आहे. जिल्ह्यातील ४६ गावांमध्ये हे फर्मान लागू करण्यात आले आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील शोरम गावात ३६ समाजांच्या खाप प्रमुखांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत खाप पंचायतीने मुलींनी वॉट्स अॅप आणि फेसबूक यासारख्या सोशल मिडीयाचा वापर करु नये असा वादग्रस्त फतवा काढला. यासोबतच मुलींच्या जीन्स आणि मोबाईल फोन वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. या पंचायतीमध्ये भारतीय किसान युनियनचे नेते चंद्रपाल फौजी म्हणाले, आधी तूम्ही मुलींना समजवून बघा आणि त्या ऐकत नसल्यास त्यांना गंगा दाखवून आणा. खापच्या या वादग्रस्त निर्णयावर सर्वत्र टीका होत असली तरी खाप पंचायतीमध्ये सहभागी झालेले नेते राजू अहलावत यांनी खापप्रमुखांनी कठोर निर्णय घेत राहावे, सुप्रीम कोर्ट आणि प्रसारमाध्यमांना घाबरु नये. एकाच गोत्रात विवाह करणे म्हणजे वेडेपणा असून अशा लोकांना चोपायलाच पाहिजे अशी मुक्ताफळेही त्यांनी उधळली आहेत.
खाप पंचायतींनी अशा प्रकारची निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्टमध्येही उत्तरप्रदेशमधील एका खाप पंचायतीने मुलींनी जीन्स वापरु नये असा फतवा काढला होता. उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे सरकार या खाप पंचायतीवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.