शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन जबरदस्तीने केले धर्मांतर
By Admin | Updated: August 4, 2014 14:07 IST2014-08-04T13:56:33+5:302014-08-04T14:07:09+5:30
उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन तिचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली आहे.

शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार करुन जबरदस्तीने केले धर्मांतर
ऑनलाइन टीम
मेरठ, दि. ४ - उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे एका शिक्षिकेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने तणाव निर्माण झाला आहे. बलात्कार करणा-या नराधमांनी जबरदस्तीने इस्लाम धर्मही स्वीकारायला लावला असे पिडीत शिक्षिकेचे म्हणणे असून या घटनेनंतर मेरठमध्ये तणाव निर्माण झाला होता. सध्या मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मेरठमध्ये खरखौडा गावात राहणारी पिडीत शिक्षिका गावातील मदरसामध्ये हिंदी आणि इंग्रजी शिकवायची. सहा महिन्यांपूर्वी तिने मदरसामध्ये शिकवणे सोडून दिले व दुस-या शाळेत काम करु लागली. ईदच्या दुस-या दिवशी मदरसामधील मौलाना सनौल्लाह, सरपंच नवाब खान, त्यांची मुलगी सना उर्फ निसरत आणि अन्य काही जणांनी तिचे अपहरण केले. अपहरणानंतर तिला हापूड येथेल मदरसामध्ये नेण्यात आले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला व त्यानंतर जबरदस्तीने तिला धर्मांतर करायला लावले. यानंतर तिला मुजफ्फरनगरमधील एका मदरसामध्ये डांबून ठेवण्यात आले होते. तिला दररोज गुंगीचे इंजेक्शन दिले जात होते असे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले आहे. रविवारी पिडीत महिलेने अपहरणकर्त्यांची नजर चुकवून तिथून पळ काढून बस स्थानक गाठले व तिथून ती खरखौडात परतली. घरी परतल्यावर तिने कुटुंबियांना सर्व घटनाक्रम सांगितला व त्यानंतर तिच्या कुटुंबाने सनौल्लाह, नवाब आणि अन्य दोघा जणांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे. वैद्यकीय चाचणीत महिलेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती मेरठमध्ये वा-यासारखी पसरली व परिस्थिती तणावपूर्ण बनली. भाजप कार्यकर्त्यांनी मेरठ - हापूड मार्गावर रास्ता रोको केला. तर संतप्त जमावाने काही घरांवर हल्लाबोल केला. पोलिस महासंचालक ए.एल. बॅनर्जी म्हणाले, या घटनेनंतर मेरठ आणि सभोवतालच्या जिल्ह्यांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.