नरबळीसाठी मुलीची व्हॉट्सअॅपवरुन केली निवड
By Admin | Updated: March 6, 2017 12:35 IST2017-03-06T11:43:20+5:302017-03-06T12:35:37+5:30
मगदी येथे गेल्याच आठवड्यात झालेल्या 10 वर्षाच्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे

नरबळीसाठी मुलीची व्हॉट्सअॅपवरुन केली निवड
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 6 - मगदी येथे गेल्याच आठवड्यात झालेल्या 10 वर्षाच्या चिमुरडीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरबळी देण्यासाठी मुलीचं अपहरण करुन हत्या करण्यात आली. अटक केलेल्या चार आरोपींची चौकशी केली असता ही माहिती मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद वासी (42). त्याची बहिण रसुद्दीनिशा (37), स्वताला जादूगर म्हणवणारी नसीमा ताज (33) आणि अजून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. या चारही आरोपींनी मिळून होसा मसीदी मोहमल्ला परिसरातील आयशा मोहम्मद या चिमुरडीचं अपहरण केलं होतं.
मोहम्मद वासी याच्या मोठ्या भावाला अर्धांगवायूचा झटका आाला होता. ते लवकर ठीक व्हावेत यासाठी मोहम्मद वासी आणि त्याची बहिण रसुद्दीनिशा यांनी नसीमा ताजची भेट घेतली होती. नसीमा ताजने रसुद्दीनिशाला सांगितलं होतं की जर 45 दिवसांच्या आत तुम्ही एका 10 वर्षाच्या मुलीचा बळी दिला नाहीत तर तुमच्या भावाचा मृत्यू होईल. आपल्या चुलत भावाची 10 वर्षांची मुलगी यासाठी एकदम योग्य असल्याचं वासीने सांगितलं, आणि तिचा फोटो काढून नसीमाला व्हाट्सअॅप केला. यानंतर नसीमाने ही मुलगी योग्य असल्याचं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार वासी आणि त्याच्या चुलत्यांमध्ये कौटुंबिक वाद असल्यानेच त्याने आयशाचा बळी घेण्याचं ठरवलं.
संध्याकाळी आयशा अभ्यास करत असताना तिला इशा-याने घराबाहेर बोलावून अपहरण करण्यात आलं. 3 मार्च रोजी मशीदीजवळ मुलीचं कापेलं मुंडकं एका पोत्यात आढळलं. संशयाच्या आधारे आयशाच्या वडिलांनी वासीविरोधात तक्रार नोंद केली. चौकशी केली असता वासीने आपण नरबळी दिल्याचं मान्य केलं.