जिओ इफेक्ट - रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी, एअरटेल, आयडियाला बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 12:35 IST2017-07-21T12:18:49+5:302017-07-21T12:35:39+5:30
रिलायन्सची जिओ इंटरनेट सेवा सुरु झाल्यापासून एअरटेल आणि आयडीया या प्रतिस्पर्धी कंपन्यांना चांगलाच फटका बसला आहे.

जिओ इफेक्ट - रिलायन्सच्या शेअर्समध्ये तेजी, एअरटेल, आयडियाला बसला फटका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 30 हजार कोटींचा निव्वळ नफा झाल्याची घोषणा केल्यानंतर तसेच जिओच्या यशाचा पाढा वाचल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 2 टक्के वाढ झाली. त्याचवेळी प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेलच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 3 टक्के आणि आयडीया सेल्युलरच्या शेअर्सच्या किमतीमध्ये 6 टक्के घट झाली.
रिलायन्सची जिओ इंटरनेट सेवा सुरु झाल्यापासून एअरटेल आणि आयडिया या प्रतिस्पर्धी कंपन्यांना चांगलाच फटका बसला आहे. रिलायन्सच्या आज वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होण्याआधीच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये 4 टक्के वाढ झाली होती. रिलायन्सच्या जिओच्या सेवेमुळे एअरटेलला प्रत्येक तिमाहीत 550 कोटी रुपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. इतकंच नाही तर रिलायन्सच्या नवीन फोन साध्या टिव्हीला जोडता येणार आहे आणि विविध वाहिन्या बघता येणार आहेत. यामुळे केबल सेवा व डिटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनाही फटका बसला आहे. डिश टिव्ही, हॅथवे या कंपन्यांचे शेअर्सही 2 ते 3 टक्क्यांनी स्वस्त झाले.
आणखी वाचा
रिलायन्सची तीन लाख 30 हजार कोटींची उलाढाल असून 30 हजार कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. ओमुळे रिलायन्सला खूप फायदा झाला असून 170 दिवसात जिओचे 10 कोटी ग्राहक झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिओने गेल्या दहा महिन्यात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. दर सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले गेले असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
मोफत मिळणार जिओचा 4G स्मार्टफोन
रिलायन्स जिओनं प्रतिस्पर्ध्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी जगातला सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. जिओ स्मार्टफोनमध्ये12 भाषा देण्यात आल्या आहेत. या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि युएसबीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
मीडियातील काही वृत्तांनुसार, रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच कलक डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच, 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर, 128 जीबी मेमरी कार्ड पण देण्यात येणार आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर, या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट देण्यात येणार आहे. तर, 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल.