जनरल सुहाग होणार नवे लष्करप्रमुख
By Admin | Updated: May 14, 2014 00:48 IST2014-05-13T23:40:35+5:302014-05-14T00:48:53+5:30
उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने मंगळवारी नियुक्ती केली. लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील.
जनरल सुहाग होणार नवे लष्करप्रमुख
नवी दिल्ली : उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने मंगळवारी नियुक्ती केली. लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून ते पदाची सूत्रे स्वीकारतील. भाजपाचा विरोध झुगारत आणि निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवताच सरकारने नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती केली आहे.
संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सुहाग यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या समितीने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. गुरखा रेजिमेंटचे अधिकारी असलेले ५९ वर्षीय सुहाग हे १२ लाख अधिकारी आणि जवान असलेल्या भारतीय लष्कराचे २६ वे प्रमुख असतील. त्यांना ३० महिन्यांचा कार्यकाळ मिळेल. सेवाज्येष्ठतेच्या आधारावर त्यांची निवड झाली आहे. चित्तोडगडच्या सैनिकी शाळेत शिकलेले सुहाग राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीतून १९७४ साली उत्तीर्ण झाल्यानंतर लष्करात दाखल झाले. श्रीलंकेतील भारतीय शांती सेनेतही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. जनरल सुहाग मूळचे हरियाणाच्या झाज्जर जिल्ह्यातील आहेत. भाजपाने नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीला जोरदार विरोध करताना नव्या सरकारला संबंधित निर्णय घेऊ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लष्करप्रमुखांच्या नियुक्तीस परवागनी देण्याची मागणी केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)