ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 12 - पाकिस्तानकडून भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत पाकिस्ताननं जाधव यांच्याबाबत जाहीर केलेल्या माहितीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. जाधव यांच्या प्रकरणामुळे पाकिस्तान जागतिक स्थरावर एकटा पडण्याची शक्यतादेखील अमेरिकेतील ज्येष्ठ विश्लेषकांनी वर्तवली आहे.
जाधव यांना पाकिस्तानानं लष्करी कायद्यांतर्गत शिक्षा सुनावली आहे. जाधव यांच्यावर पाकिस्तानकडून लावण्यात आलेले आरोप भारतानं वारंवार फेटाळल्यानंतरही नियम आणि कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवून पाकिस्ताननं जाधव यांना भारतीय गुप्तहेर आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जाधव यांच्या शिक्षेवर स्वतः पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांनी शिक्कामोर्तब केला.
अमेरिकेतील तज्ज्ञ अलेसा एर्स यांनी सांगितले की, "कुलभूषण जाधव प्रकरणात गंभीर स्वरुपातील अनियमितता आढळून येत आहे. शिवाय त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी वकिलही देण्यात आला नाही. सोबत तपासात कमालीची गुप्तता पाळण्यात आली. तर दुसरीकडे जाधव यांच्या प्रकरणात ज्या प्रकारची गती दाखवण्यात आली, त्याप्रमाणे मुंबई हल्ल्यातील आरोपी दहशतवाद्यांवर खटला चालवण्यात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. या दोन्ही प्रकरणांत मोठी तफावत दिसत आहे. तर गेल्या 9 वर्षांपासून मुंबई हल्ला प्रकरणं टाळलं जात आहे".
अटलांटिक काउंसिलमधील दक्षिण आशिया सेंटरचे संचालक भारत गोपालस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, "जाधव यांना ज्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा सुनावण्यात आली, ते पुरावे बरेच कमकुवत आहेत. शिवाय पाकिस्तानद्वारे या प्रकरणी मांडण्यात आलेली कहाणीदेखील विश्वासार्ह वाटत नाही".
गोपालस्वामी यांनी असेही सांगितले की, "जाधव यांच्याविरोधात कोणताही पुरावा समोर ठेवल्याशिवाय त्यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावणं हे राजकीय आकसापोटी करण्यात आल्याचं दिसत आहे. पाकिस्तान दहशवादाविरोधात गंभीर स्वरुपातील पाऊल उचलत नाही, या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक स्थरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी आक्रमक रणनीती आखली आहे. भारताच्या या प्रयत्नांना उलट उत्तर म्हणून आकसापोटी पाकिस्ताननं जाधव यांनी शिक्षा सुनावली आहे".
"जाधव यांच्याबाबत पाकिस्तानकडून सांगण्यात येत असलेली कहाणी पूर्णतः अनिश्चित आणि रहस्यमय वाटत आहे. यावरुन पाकिस्तान भारताला कठोर संदेश देऊ इच्छितो, हे स्पष्ट असल्याचे मत", वुड्रो विल्सन सेंटरचे दक्षिण आशियाचे उपसंचालक मायकल कुलगेमन यांनी व्यक्त केले आहे.
कुलभूषण जाधव फाशी प्रकरणामुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध आणखी ताणले जातील, अशी शक्यता अमेरिकेतील तज्ज्ञांनी अधिक व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या घडामोडींमुळे दोन्ही देशांमध्ये संवाद सुकर होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान, अमेरिकी स्टेट डिपार्टमेंट आणि व्हाइट हाऊसनं अद्यापपर्यंत जाधव प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.