'Gas' changed the way | ‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग
‘वायू’ ने पुन्हा बदलला मार्ग

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने वारंवार आपला मार्ग बदलल्याने हवामान विभागासह प्रशासनाला बुचकळ्यात टाकले असून शनिवारी त्याने आपला मार्ग पुन्हा बदलून कच्छ दिशेने सरकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सौराष्ट्र, कच्छ भागात पुन्हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कर्नाटकाच्या दक्षिण भागात आगमन झालेल्या मान्सूनची शनिवारी प्रगती झाली नाही़ येत्या दोन दिवसात कर्नाटक, तमिळनाडूचा उर्वरित भाग तसेच ईशान्यकडील बंगालचा उपसागर, सिक्कीममध्ये आगमनाच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुजरातच्या किनारपट्टीला धडकणार असे जाहीर करण्यात आले होते़ त्यादृष्टीने हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुजरात राज्य सरकारने खबरदारीच्या उपाय योजना केल्या होत्या़ त्यानंतर गुरुवारी ‘वायू’ने आपला मार्ग बदलून तो पुन्हा समुद्राच्या दिशेने वळला होता़ त्यामुळे ‘वायू’ आता समुद्रातच शमणार, ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले़ त्यानंतर शनिवारी पहाटे पुन्हा एकदा त्याने आपला मार्ग बदलून ते आता कच्छ दिशेने पुढे सरकू लागले आहे़ शनिवारी दुपारी ते पोरबंदरपासून ३२५ किमी, वेरावळपासून ३८० किमी आणि दीवपासून ४३५ किमी अंतरावर होते.

येत्या २४ तासात या चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून तीव्र चक्रीवादळाचे चक्रीवादळात रुपांतर होईल़ १७ जूनला त्याची तीव्रता आणखी कमी होऊन सायंकाळी ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ सौराष्ट्र, कच्छ भागात पुढील तीन दिवस तर उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानमध्ये १८ जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे़

मुंबईत मान्सूनची प्रतीक्षाच
मुंबई : अरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकलेल्या वायू चक्रीवादळाची दिशा बदल्यामुळे मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचलेल्या पावसाला कोकणात येण्यास आणखी विलंब होणार आहे. परिणामी, शहरात गेले दोन दिवस अधूनमधून हलक्या सरी सुरू असल्या, तरी मुंबईला आणखी काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे.या वर्षी मान्सून विलंबानेच केरळमध्ये पोहोचला आहे. त्यातच अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ धडकले. त्यामुळे गेले काही दिवस मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. या वादळाचा प्रभाव पुढील दोन दिवसही राज्यातील किनारपट्टींवर कायम असणार आहे. त्यामुळे मुंबईत ढगाळ वातावरण व हलक्या सरी सुरू राहतील. मात्र, मान्सूनचे मुंबईतील आगमन पुढच्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडले आहे.


Web Title: 'Gas' changed the way
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.