छत्तीसगडमध्ये शहीदांचा अपमान, गणवेश आढळला कचरा पेटीत
By Admin | Updated: December 4, 2014 12:36 IST2014-12-04T12:36:39+5:302014-12-04T12:36:39+5:30
छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे गणवेश कचराकुंडीत फेकल्याचा संतप्त प्रकार उघड झाला आहे.

छत्तीसगडमध्ये शहीदांचा अपमान, गणवेश आढळला कचरा पेटीत
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ४ - शहीद जवांनाचा सन्मान करायला हवा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असले तरी त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये शहीदांचाच अपमान झाला आहे. दोन दिवसांपूर्वी नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे गणवेश कचराकुंडीत फेकल्याचा संतप्त प्रकार उघड झाला आहे.
सोमवारी छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात सीआरपीएफचे १४ जवान शहीद झाले होते. या जवानांचे पार्थिव रायपूरमधील आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले होते. याच रुग्णालयात सर्व शहीद जवानांचे शवविच्छेदनही झाले. वीरपुत्राला गमावलेल्या कुटुंबियांचे सांत्वन करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रतापच रुग्णालय प्रशासनाने केला. या शहीद जवानांचे गणवेश व बुट कचराकुंडीमध्ये फेकण्यात आले होते. रुग्णालयात आलेल्या नातेवाईकांनी हा प्रकार बघितला व त्याचे छायाचित्र काढून प्रसारमाध्यमांमध्ये दिले. यानंतर छत्तीसगड काँग्रेसच्या नेत्यांनी घटनास्थळी धाव घेत मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कचराकुंडीजवळ फेकलेले गणवेश सन्मानपूर्वक उचलून प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात नेले. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना गणवेश सुपूर्त करण्याची विनंती केली. मात्र नेत्यांनी नकार दिला. अखेर सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी काँग्रेस कार्यालयात गेले व त्यांनी या जवानांचे गणवेश ताब्यात घेतले.